अजित मांडके,
ठाणे- ठाणेकरांना उत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सुविधा मिळावी, म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख स्वर्गीय आनंद दिघे यांनी महापालिकेची स्वत:ची अशी हक्काची ठाणे परिवहन सेवा सुरू केली. परंतु, आज या सेवेचा पूर्र्णपणे बट्ट्याबोळ झाला आहे. प्रवाशांना वेळेवर बस न मिळणे, कर्मचाऱ्यांची थकबाकी, वागळे, कळवा आणि लोकमान्य आगारांची झालेली दुरवस्था, बसदुरुस्तीसाठी लागणारे साहित्य अपुरे, कर्मचाऱ्यांकरिता कोणत्याही सुविधा नाही, थकबाकी, १७ वर्षांपासून ४५ कर्मचारी कंत्राटी स्वरूपात, कार्यशाळेच्या छताला, गळती, कर्मचाऱ्यांना वेळेवर बस उपलब्ध न होणे, अपुरे मनुष्यबळ, बढती न मिळणे, कामाच्या ठिकाणची जागा योग्य नसणे यांसह इतर सर्वच पातळ्यांवर ठाणे परिवहन सेवा सपेशल अपयशी ठरली आहे. त्यामुळे परिवहन आगारच नाही, तर परिवहन प्रशासनही आता भंगारात काढा, असा सूरच ‘लोकमत’च्या आॅन दी स्पॉट रिपोर्टरच्या पाहणीतून उमटला आहे. असे असतानाही परिवहन ही बेस्टमध्ये विलीन न करता ती सक्षम करण्याचा दावा मात्र लोकप्रतिनिधी करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. परिवहनची मुहूर्तमेढ ९ फेब्रुवारी १९८९ रोजी झाली. सुरुवातीला पाच बस असताना काही काळातच या बस २५ च्या घरात गेल्या, तर कर्मचाऱ्यांची संख्या ही ७० च्या आसपास होती. परंतु, ठाण्याची लोकसंख्या वाढत गेली आणि आजघडीला परिवहनच्या ताफ्यात रेकॉर्डवर ३६३ बस दाखवल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात ३१३ बस ताफ्यात आहेत. असे असले तरीही रस्त्यावर मात्र त्यातील १८० ते १९० बस रोज धावतात. वाढत्या लोकसंख्येला या बस अपुऱ्या पडत आहेत. परिवहनचे आजघडीला ६५ मार्ग असून २३०० च्या आसपास कर्मचारी आहेत. परंतु, आजही वाहकांची कमतरता परिवहनला जाणवत आहे. त्यामुळेच नव्याने दाखल होणाऱ्या १९० बस आजही दाखल झालेल्या नाहीत. कर्मचाऱ्यांची १०० कोटींहून अधिक थकबाकी, धुलाई, सुटीचा भत्ता यासह इतर भत्तेही प्रलंबित आहेत. पाचव्या, सहाव्या वेतन आयोगांतील फरकही अद्याप कर्मचाऱ्यांच्या हाती नाही. विशेष म्हणजे कार्यशाळेची दुरवस्था असतानाही परिवहन व्यवस्थापक येथे फिरकतच नसल्याचा आरोप कर्मचारी दबक्या आवाजात करीत आहेत. कार्यशाळा विभागातील प्रत्येक दुरुस्तीच्या इमारतींचीदेखील अवस्था दयनीय झाली असून त्या केव्हाही पडू शकतात, अशी परिस्थिती आहे. कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या इमारतींचीही दुरवस्था असून तेथे अनेक सोयीसुविधांची वानवा आहे. कर्मचाऱ्यांना बरे वाटावे म्हणून अर्धवट रंगरंगोटी केली आहे. स्वच्छतागृहांची अगदी दुरवस्था झाली असून तेथेच कर्मचाऱ्यांना घाणीत डबे खावे लागत आहेत. भंगाराच्या ढिगाऱ्यांचा डोंगर दिवसेंदिवस वाढत असून दुरुस्तीच्या काही विभागांत पावसाचे पाणी शिरून तेथे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती झाल्याने कर्मचारी आजारी आहेत.