ठाणे : आधीच ठाणेकरांना सेवा देण्यात कमी पडलेल्या टीएमटीचा आणखी एक कारभार परिवहन समितीच्या पहिल्याच बैठकीत उघडकीस आला आहे. टीएमटीच्या बस रोज किती किमी धावतात, टायर किती कालावधीनंतर बदलणे अपेक्षित असते, यासह इतर बाबींसाठी महत्त्वाचे ठरणारे स्पीडो मीटरच परिवहनकडे नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. केवळ अंदाजानेच याचा अंदाज बांधला जात असल्याचे उत्तर परिवहन प्रशासनाने दिले. त्यामुळे आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय, असेच म्हणण्याची वेळ आली असल्याचा आरोप परिवहन समिती सदस्यांनी केला.तब्बल दोन वर्षांनंतर सोमवारी नवनिर्वाचित सदस्यांची पहिलीच बैठक ठाणे महापालिकेत पार पडली. या बैठकीत परिवहनची चिरफाड विरोधकांनी केली. टायर खरेदीसंदर्भातील विषय चर्चेसाठी पटलावर आला असताना या विषयाच्या अनुषंगाने मनसेचे सदस्य राजेश मोरे यांनी परिवहनच्या कारभाराचा पाढाच वाचण्यास सुरुवात केली. टायर किती चालल्यानंतर ते बदलले जातात, ते बदलताना काय काळजी घेतली जाते, नवीन टायर आल्यावर जुन्या टायरचे काय केले जाते, टायर किती किमी धावले, याचा अंदाज बांधण्यासाठी स्पीडो मीटर आहे का... असे अनेक सवाल उपस्थित करून त्यांनी प्रशासनाला अडचणीत आणले. यावर, परिवहन प्रशासनाने ही बाब मान्य केली असून केवळ एखादी बस एखाद्या मार्गावर किती किमी धावली आहे, त्यावरच टायरचेदेखील किमी मोजले जात असल्याचे उत्तर प्रशासनाने दिले. परंतु, आता स्पीडो मीटरचा प्रस्ताव तयार करून लवकरच तो पटलावर मांडला जाईल, अशी माहिती परिवहनचे प्रभारी व्यवस्थापक संदीप माळवी यांनी दिली. (प्रतिनिधी)>भविष्य निर्वाह निधीची रक्कम इतरत्र वर्गठाणे परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांनी दिली जाणारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम इतर कामांसाठी वर्ग करण्यात येत असल्याची बाब उघडकीस आली आहे. यापुढे असे होणार नसल्याचे आता प्रशासनाने मान्य केले आहे. तसेच एखाद्या बसला इंजीन नसेल तर दुसऱ्या बंद बसचे इंजीन काढून त्या बसला बसवले जात असल्याचाही प्रताप परिवहनकडून सुरू असल्याचे समोर आले.>चेतना बँकेने बुडवले परिवहनचे ७० लाखभविष्य निर्वाह निधीची रक्कम ठाणे परिवहन सेवेने चेतना बँकेत जमा केली होती. परंतु, ही बँकच बुडीत निघून बंद झाली. त्यामुळे परिवहनने गुंतवलेले ७० लाखही बुडाले आहेत. त्याची वसुली झालीच नसून ते कसे वसूल केले जाणार किंवा याची माहितीदेखील प्रशासनाला नसल्याची बाब समोर आली. सदस्यांनी या मुद्यावरून प्रशासनाला अडचणीत आणल्यानंतर हे प्रकरण काय आहे, त्याची माहिती घेतली जाईल. तसेच यापुढे राष्ट्रीयीकृत बँकेतच पैसे जमा केले जातील, असे उत्तर प्रभारी परिवहन समिती व्यवस्थापक संदीप माळवी यांनी दिले. >पहिल्याच बैठकीत प्रशासनावर आगपाखडदोन वर्षांनंतर झालेल्या पहिल्याच बैठकीत सभापतींचे अभिनंदन करतानाच सर्वपक्षीय सदस्यांनी परिवहनमध्ये असलेल्या त्रुटींचा पाढा वाचला. भविष्य निर्वाह निधीची रक्कम, कर्मचाऱ्यांची देणी, अपुरी बससेवा, टीसींचा गडबडीचा कारभार, अग्रीम रकमा आदी विषयांना हात घालून प्रशासनाला सदस्यांनी चांगलेच अडचणीत आणले.>काय आदेश द्यायचे रेपरिवहनचा कारभार हाकण्यासाठी सभापती हा सदस्यांप्रमाणेच कणखर असावा लागतो. पहिल्याच बैठकीत विविध विषयांना हात घालून सदस्यांनी नवनिर्वाचित सभापती दशरथ यादव यांनी आदेश देण्यास सांगितले. परंतु, काय आदेश द्यायचे, असे सभापतींनीच सदस्यांना विचारले. त्यामुळे सभागृह चांगलेच पेचात पडले होते. विशेष म्हणजे दोन तासांच्या मॅरेथॉन बैठकीत सभापतींनी मौनीबाबाची भूमिका बजावली.
टीएमटीला स्पीडो मीटरच नाही
By admin | Published: June 28, 2016 4:03 AM