ठाणे : आधी काम करा मगच मागण्यांचे बोला अशी भूमिका पालिका प्रशासनाने परिवहनच्या कामगारांच्या बाबतीत घेतली आहे. परंतु, खाजगी बस परिवहनचे प्रवासी पळवत असल्याने, टीएमटीचे उत्पन्न काही केल्या वाढत नाही. त्यामुळे मागण्याही पूर्ण होणे कठीण असल्याने आता या कामगारांनी खाजगी बसवर कारवाई करावी म्हणून अनोखे पाऊल उचलले आहे. ठाणे परिवहन कामगार एकता गृपच्या सदस्यांनी घोडबंदर मार्गावर केवळ दोन तासांचा सर्व्हे करुन बसचे क्रमांक घेतले आहेत. याची एक यादी तयार करुन ती वाहतूक पोलिसांना स्वाधीन केली आहे. त्यानुसार या बस बंद करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. महिन्याभरापूर्वी कॅडबरी जवळ झालेल्या एका घटनेनंतर वाहतूक पोलिसांनी खाजगी बसवर कारवाई केली होती. आरटीओनेदेखील कारवाईसाठी पुढाकार घेतला होता. परंतु, तीन, चार दिवस कारवाई झाल्यानंतर ती थांबविण्यात आली. आजही घोडबदंरच्या अनेक मार्गांवर या खाजगी बस धावत असल्याने टीएमटीचे उत्पन्न मात्र बुडत आहे. त्यामुळेच टीएमटीच्या कामगारांनी खाजगी बसच्या विरोधात हा लढा उभारला आहे. दरम्यान ठाणे परिवहन कामगार एकता गृप च्या कामगारांनी माजिवडा येथे शनिवारी केवळ दोन तास बस थांब्यावर बसून खाजगी बसचे नंबर नोंद केलेले आहेत. या दोन तासात ५० हून अधिक बस घोडबंदर मार्गावर जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दोन तासात एवढ्या खाजगी बसेस प्रवाशी वाहतूक करत असतील तर संपूर्ण दिवसभरात किती खाजगी बस प्रवासी वाहतूक करत असतील याची दक्षता घ्यावी, अशी मागणी त्यांनी ठाणे वाहतूक पोलिसांकडे केली आहे. (प्रतिनिधी)
टीएमटीचा खाजगीवर हल्लाबोल
By admin | Published: April 27, 2016 3:48 AM