संशयाचं वातावरण दूर करण्यासाठी अशोक चव्हाणांनी 'ते' विधान केले; शिंदे गटाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 02:58 PM2022-09-29T14:58:12+5:302022-09-29T14:58:59+5:30
सर्व निवडणूकांमध्ये शिवसेना जिंकावी याकरिता फक्त एकनाथ शिंदे यांनी मेहनत घेतली आहे. अशा प्रकारच्या खोट्या वावड्या उठवून काहीही फरक पडणार नाही असं शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणाले.
मुंबई - काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलेल्या गौप्यस्फोटात काहीच तथ्य नाही. चव्हाणांनी काय आदर्श ठेवलाय हे जनतेसमोर सर्वांना माहिती आहे. ते नाराज असताना युवराजांच्या मागेपुढे करताना पाहिले आहे. मध्यंतरी अशोक चव्हाणकाँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यामुळे संशयाचं वातावरण दूर करण्यासाठी ते अशी विधानं करत असल्याचा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे.
नरेश म्हस्के म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष आणि इतर ठिकाणी अशोक चव्हाण मतदानाला आले नाही दरवाजे बंद असल्याचं कारण दिले. यामुळे त्यांच्या विरोधात संशयाचे वातावरण आहे ते दूर करण्याकरता ते असे वक्तव्य करताहेतय अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये राहणार की बाहेर पडणार अशी चर्चा आहे त्यामुळे त्यांनी केलेल्या गौप्यस्फोटात काही तथ्य नाही असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत सर्व निवडणूकांमध्ये शिवसेना जिंकावी याकरिता फक्त एकनाथ शिंदे यांनी मेहनत घेतली आहे. अशा प्रकारच्या खोट्या वावड्या उठवून काहीही फरक पडणार नाही. कावळ्याच्या शापाने गाई मरत नसते असं सांगत नरेश म्हस्केर यांनी न्यायालयाच्या निकालावर भाष्य केले. देवीची आम्ही मनोभावे पुजा करतो. देवी कोणाच्या बाजुने आहे हे दोन दिवसांपूर्वी न्यायालयाच्या निकालामुळे स्पष्ट झाले आहे. राजन विचारे म्हणाले की, मी देवीचा खरा भक्त आहे, तर खरा भक्त कोण आहे हे देवी ठरवेल. सगळेच देवीचे भक्त आहेत. देवीचा कौल कोणाला मिळाला यावरुन समजले की, देवीचा खरा भक्त कोण आहे ते असा टोला म्हस्केंनी राजन विचारेंना लगावला आहे.
काय म्हणाले होते अशोक चव्हाण?
भाजपा-शिवसेना युती काळात शिवसेनेने युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी शिष्टमंडळात एकनाथ शिंदेंचाही समावेश होता. शिवसेना नेत्यांनी माझी मुंबईतील कार्यालयात भेट घेतली होती. भाजपासोबत राहायचे नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. २०१९ च्या निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतरही शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आली त्यामुळे अनेकांना धक्का बसला परंतु ही भूमिका देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाची होती असा खुलासा त्यांनी केला. तसेच याप्रकारचं सरकार स्थापन करायचं असेल तर तुम्ही आधी पवार साहेबांशी चर्चा करा असं मी शिवसेना नेत्यांना म्हटलं. परंतु ते पवारांना भेटले नाहीत त्यांचे पुढे काय झालं याबाबत माहिती नाही अस अशोक चव्हाणांनी म्हटलं.