लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सरकारी रुग्णालयांमध्ये तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र सुरू करावीत, अशी मागणी ‘तंबाखूविरोधी दिना’च्या निमित्ताने मुंबईतील काही डॉक्टरांनी मिळून केली. डॉ. रमाकांत देशपांडे यांनी या विषयीचा प्रस्ताव राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे सादर केला. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, डॉ.सावंत यांनी मान्यता दिली असून, याविषयी लवकरच सविस्तर बैठक घेऊन आराखडा तयार करण्याचे आश्वासन दिले आहे.येत्या दोन आठवड्यांमध्ये आम्हाला या संदर्भातील कृती आराखडा त्यांच्यासमोर सादर करावयाचा आहे, असे आॅन्कोसर्जन डॉ. संजय शर्मा यांनी सांगितले. या विषयी आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, ‘तंबाखूचे सेवन कमी करण्यासाठी आणि तंबाखूच्या व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी, येत्या सहा महिन्यांमध्ये सरकारतर्फे व्यसनमुक्ती केंद्र स्थापन करण्यात येतील.’ मुंबईतील एका खासगी रुग्णालयात पहिल्यांदाच तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र सुरू होणार आहे. खासगी रुग्णालयातील हे अशा प्रकारचे पहिलेच केंद्र असणार आहे. तंबाखूचे सेवन हे कर्करोगाची लागण होण्यासाठीचे एक प्रमुख कारण असल्याचे दिसून आले आहे, असे डॉ. देशपांडे यांनी सांगितले. आरोग्यमंत्र्यांशी या प्रस्तावाबाबत चर्चा करण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात डॉ. संजय शर्मा यांच्यासोबत डॉ. रोहन बारटक्के, डॉ. कृष्णकुमार दुबे सहभागी झाले होते.देशात दर वर्षी तंबाखू सेवनामुळे १.२ लाख व्यक्तींचा मृत्यू होतो. येत्या पाच वर्षांत हा आकडा १.५ लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. २०२० सालातील १६.५ लाख नव्या कर्करुग्णांपैकी ३० टक्के रुग्ण हे तंबाखू सेवनाशी निगडित असतील आणि त्यावर प्रतिबंध घालता येऊ शकतो. तंबाखूचे सेवन करणाऱ्या ९० टक्के व्यक्तींना तंबाखूपासून निर्माण होणाऱ्या धोक्यांबद्दल जाणीव असते, परंतु तंबाखूचे व्यसन कसे सोडवायचे, याची माहिती त्यांना नसते. तंबाखूचे व्यसन सोडविण्यासाठी आपल्या सरकारी रुग्णालयांमध्ये एक निश्चित अशा तंबाखू बंदी उपक्रमाची आवश्यकता आहे, असेही डॉ. देशपांडे यांनी सांगितले.
सरकारी रुग्णालयांमध्ये होणार तंबाखूमुक्ती केंद्र
By admin | Published: June 05, 2017 2:44 AM