मुंबई : तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर निर्बंध यावेत, म्हणून केंद्र सरकारकडून तंबाखूजन्य वस्तूंवर २६ टक्के पाप कर (सिन टॅक्स) लादण्याचे प्रस्तावित आहे. मात्र तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणारे मृत्यू आणि संबंधित आजारांवरील वैद्यकीय उपचारासाठी होणारा खर्च पाहता ४० टक्के पाप कर लादण्याची मागणी टाटा कॅन्सर रुग्णालयातील डॉक्टर व तंबाखुमुक्तीसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.गेल्या वर्षी देशात तंबाखूजन्य पदार्थांमुळे झालेल्या विकारांमुळे सरासरी १० लाख लोकांचा मृत्यू झाला होता. तर तंबाखूजन्य पदार्थांमुळे झालेल्या आजारांवर उपचारापोटी सरासरी एक लाख कोटी रुपये खर्च करावे लागले. त्यामुळेच जीएसटी परिषदेमध्ये तंबाखू, सिगारेट, विडी यांसारख्या वस्तूंवर २६ टक्के कर लावण्याची शिफारस देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी केली आहे. मात्र हा कर खूपच तोकडा असून किमान ४० टक्के पाप कर लावण्याची मागणी विविध स्वयंसेवी संस्थांनी केली असून कॅन्सर तज्ज्ञांनीही त्यास पाठिंबा दिला आहे.यासंदर्भात टाटा कॅन्सर रुग्णालयातील कॅन्सर तज्ज्ञ डॉ. पंकज चतुवेर्दी यांनी सांगितले की, इतर देशांच्या तुलनेत भारतात तंबाखूचे प्रमाण अधिक आहे. येथील सरासरी २७ कोटी ५० लाख लोक तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. त्यातील ३५ टक्के प्रौढ हे तंबाखूजन्य वस्तूंच्या संपूर्ण आहारी गेलेले आहेत. त्यातून होणारे मृत्यू आणि विकारांवरील खर्च यांमुळे रूग्णांच्या कुटुंबियांना होणारा मानसिक त्रास आणि रोजगारावर होणारा परिणाम यांची मोजदाद होणे अशक्य आहे.>...तर मृत्युदर वाढेल!तंबाखूजन्य पदार्थांवर ४० ऐवजी २६ टक्के पाप कर आकारल्यास सरकारला १० हजार ५१० कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागेल, असा अंदाज आयआयटी जोधपूरचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. रीजो जॉन यांनी व्यक्त केला आहे. मावा, गुटखा, तंबाखूच्या किंमती कमी असल्याने युवक त्याकडे आकर्षित होत आहेत. याउलट तंबाखूजन्य पदार्थांवरील पाप करात वाढ केल्यास सिगारेट, तंबाखूची उत्पादने सहज विकत घेता येणार नाहीत. जर करात कपात केली, तर सेवनाचे प्रमाण वाढून मृत्यू दरातही वाढ होण्याची भीती निवेदनात व्यक्त केली.
तंबाखूवरील पापकर ४० टक्के करा!
By admin | Published: November 02, 2016 5:34 AM