पुणे : महापालिकेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याअगोदर मेट्रोचे भूमिपूजन करण्याचे महापौरांनी रद्द केले असले, तरी काँग्रेसकडून मात्र मेट्रोचे स्वतंत्र भूमिपूजन केले जाणार आहे. स्वारगेट येथे शुक्रवारी सकाळी १० वाजता मेट्रो प्रकल्पाचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन केले जाणार आहे.पुणे मेट्रोच्या मंजुरीच्या वाटचालीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचा मोठा वाटा आहे. महापालिकेतील पक्षनेत्यांच्या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन व्हावे, असा ठराव झाला असतानाही मोदींच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस जरी माघार घेऊन पंतप्रधानांच्या कार्यक्रमात सहभागी झाली, तरी आम्ही मात्र स्वतंत्र भूमिपूजन करणार, अशी भूमिका काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी मांडली आहे.काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन व्हावे, याला आमचा पाठिंबा होता. त्यासाठी महापौर प्रशांत जगताप यांना निवेदनही दिले होते. या कार्यक्रमाला राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, पंतगराव कदम, विश्वजित कदम, हर्षवर्धन पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे रमेश बागवे यांनी स्पष्ट केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याअगोदर मेट्रोचे प्रतीकात्मक भूमिपूजन काँग्रेसकडून केले जात आहे. मेट्रोचे श्रेय घेण्यावरून राष्ट्रवादी, भाजपा व काँग्रेस या सगळ्याच पक्षांत मोठी चढाओढ लागली आहे.
मेट्रो प्रकल्पाचे आज काँग्रेसकडून भूमिपूजन
By admin | Published: December 23, 2016 1:05 AM