औरंगाबाद : ‘आॅरिक’ अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटीचे कामकाज पाच मजली इमारतीतून चालणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी सकाळी साडेदहा वाजता या ‘आॅरिक हॉल’चे भूमिपूजन होणार आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी १३० कोटींचा खर्च अपेक्षित असून, दोन वर्षांत बांधकाम पूर्ण होणार आहे.दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत ‘आॅरिक’ची उभारणी केली जात आहे. शेंद्रा परिसरात ५० एकर जमिनीवर ‘सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट’ उभारण्यात येणार असून, आॅरिक हॉल हा ‘सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट’चाच भाग असणार आहे. दहा हजार हेक्टर क्षेत्रावरील ‘डीएमआयसी’चे कामकाज या अडीच लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या आॅरिक हॉलमधून चालणार आहे. ‘पर्किन्स’चे आज उद्घाटन‘पर्किन्स’चा भारतातील तिसरा प्रकल्प शेंद्रा औद्योगिक वसाहतीत उत्पादन घेण्यास सज्ज झाला आहे. मुख्यमंत्री फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी १० वाजता या ‘पर्किन्स’चे उद्घाटन होणार आहे. ‘पर्किन्स’ने शेंद्र्यात ७५० कोटींची गुंतवणूक केली असून, वर्षाला ३० हजार डिझेल इंजिन तेथे तयार होणार आहेत. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ‘आॅरिक हॉल’चे भूमिपूजन
By admin | Published: November 09, 2016 5:45 AM