मुंबई : भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती असून त्यानिमित्त बीडमधील गोपीनाथ गडावर समर्थकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने राज्यभरातून त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी सकाळपासूनचं गोपीनाथ गडावर मोठी गर्दी केली आहे. मात्र यात उसतोडणी मजुरांची संख्या मोठ्याप्रमाणावर आहे. त्याचे कारण म्हणजे आपल्या राजकीय कारकिर्दीत मुंडेंनी ऊसतोडणी मजुरांसाठी केलेल्या कामांनी ऊसतोडणी मजुरांचे ते श्रद्धास्थान बनले होते.
राज्यातील ऊसतोडणी कामगारांच्या व्यथा जाणून घेत गोपीनाथ मुंडे यांनी ऊसतोड मजूरांच्या प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. ते नेहमीच ऊसतोड मजूरांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असायचे त्यामुळे त्यांना उसतोड मजुरांचा नेता म्हणून ओळख मिळाली होती. सरकारमध्ये असो किंवा विरोधात, मुंडे यांनी ऊसतोड कामगारांचे प्रश्न प्राधान्याने मांडून ते सोडवून घेण्याचा प्रयत्न केला.
तर भगवानगडाचा विचार केला तर ऊसतोडणी मजुरांचे हे श्रद्धास्थान आहे. भगवानगडाला धार्मिकस्थळ म्हणून पाहिलं जातं. ऊसतोडणी मजुरांचा इथं दरवर्षी मेळावा होतो. ऊस तोडायला जाण्यापूर्वी आपलं काम पूर्णत्वास जातं अशी प्रार्थना करण्याची त्यांची इच्छा असते. त्यामुळे भगवानगड आणि गोपीनाथ मुंडे यांच्या निमित्ताने ऊसतोडणी कामगारांना धार्मिक आणि राजकीय चेहरा मिळाला असल्याचे बोलले जात होते.
बीड जिल्ह्यातील वंजारी समाजातील बहुतेक कुटुंब ऊसतोडणी मजुर आहेत. तर ह्या समाजाचे श्रद्धास्थान म्हणजे भगवानगडावरील भगवान बाबा समजले जातात. गोपीनाथ मुंडे अनेक वर्षे येथील दसरा मेळाव्यात सहभागी व्हायचे. त्यांना मानणारा बीड जिल्ह्यातला वंजारी समाज मोठ्या संख्येने त्याला उपस्थित असायचा. तर मुंडे सुद्धा नेहमीच ऊसतोडणी मजुरांच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंच्या रूपाने ऊसतोडणी कामगारांना राजकीय चेहरा मिळाला होता.