मुंबई : मुंबईतील प्रमुख पाच कपडा बाजारांमध्ये सुरू असलेला गुमास्ता कामगारांचा संप मंगळवारी रात्री मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारपासून मुंबईकरांना खरेदीचा आनंद लुटता येणार आहे.याआधी दक्षिण मुंबईतील सी वॉर्डमधील मुळजी जेठा मार्केट, मंगलदास मार्केट, स्वदेशी मार्केट, काकड मार्केट आणि हनुमान गल्लीतील कपड्याच्या पाच प्रमुख बाजारपेठांमधील गुमास्ता कामगारांनी शुक्रवारपासून संप पुकारला होता. त्यामुळे गिऱ्हाईकांसोबत येथील व्यापारी वर्गाचीकामे रखडली होती. सकारात्मक चर्चा होत नसल्याने मंगळवारी गुमास्ता कामगारांनी आक्रमक पवित्रा घेत मंगलदास मार्केटबाहेर दगडफेकही केली. त्यात पोलिसांनी काही कामगारांना ताब्यात घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांना चर्चेसाठी बोलावले. युनियनच्या शिष्टमंडळाची बैठक कामगार मंत्री संभाज पाटील निलंगेकर यांच्यासोबत झाली. त्यात कामगारांच्या मागण्या जाणून घेत बुधवारी व्यापारी संघटनांची संयुक्त कृती समिती आणि गुमास्ता युनियनची संयुक्त बैठक बोलावली आहे. (प्रतिनिधी)कामगार मंत्र्यांच्या दालनात सायंकाळी ५.३० वाजता ही बैठक पार पडेल. सरकार सकारात्मक दिसत असल्याने सायंकाळी उशीरा संप मागे घेण्याची घोषणा गुमास्ता युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी केली.>...म्हणून संप घेतला मागे मुख्यमंत्री आणि कामगार मंत्री यांनी कामगारांची जबाबदारी घेत संप मागे घेण्याची विनंती केल्याने आंदोलन मागे घेत असल्याची प्रतिक्रिया शशांक राव यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, कामगारांच्या मागण्या रास्त असल्याचे सरकारने स्पष्ट केले. शिवाय कामगारांची जबाबदारीही घेतलेली आहे. सरकारच्या सकारात्मक चर्चेमुळे कामगारांसाठी संप मागे घेतला आहे.
आजपासून कपडा बाजार खुला
By admin | Published: October 19, 2016 6:13 AM