भुजबळांची ग्वाही : उड्डाण पुलाच्या कार्यक्रमाला दोन मंत्र्यांसह दोन्ही खासदारांची दांडीगोंदिया : सध्या गोंदिया जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यभर पावसाअभावी बिकट परिस्थिती आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण अर्थव्यवस्थातच कोलमडत आहे. अशा परिस्थितीत केंद्राने तर मदत द्यावीच, पण नाही दिली तरी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी राहील, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली.गोंदियातील बहुप्रतीक्षित रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पणप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी आ.राजेंद्र जैन, आ.गोपालदास अग्रवाल, आ.डॉ.खुशाल बोपचे, आ.रामरतन राऊत, नगराध्यक्ष सुशीला भालेराव, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. शिंदे उपस्थित होते. पंचायत समिती सभापती सरिता अंबुले, उपसभापती चमन बिसेन, सा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता के.पी. जनबंधू आदी प्रामुख्याने उपस्थित होते.गड्डाटोली भागातील पुलाच्या एका टोकावर फित कापून लोकार्पण केल्यानंतर आंबेडकर चौकानजिक उभारण्यात आलेल्या मंडपात इतर कार्यक्रम पार पडला. तत्पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला ना. भुजबळ यांच्या हस्ते हारार्पण करण्यात आला.यावेळी बोलताना ना.भुजबळ म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे पहिल्यांदाच असा रेल्वे उड्डाणपूल बनविण्यात आला आहे. यापूर्वी रेल्वेचे सर्व पूल रेल्वे विभागानेच बनविले आहे असे सांगून त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे विशेष कौतुक केले. हा पूल जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. ३५ कोटी रुपये केंद्र शासन व १६ कोटी रुपये राज्य सरकारद्वारा देऊन या आंतरराज्यीय पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यासाठी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रात विशेष प्रयत्न केल्याचा उल्लेखही त्यांनी केला. गोंदिया जिल्ह्यातील विकासकामांकरिता २६८ कोटी रुपये निधीतून ५५ कामे पूर्ण झाली असून १३४ कामे सुरू असल्याची माहिती ना.भुजबळ यांनी दिली. सुरूवातीला आ.राजेंद्र जैन, आ.गोपालदास अग्रवाल यांनी आपल्या भाषणात शहरात पुढील काळात येऊ होऊ घातलेल्या कामांची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री अनिल देशमुख, रोहयोमंत्री नितीन राऊत, खा.प्रफुल्ल पटेल आणि नवनिर्वाचित खा. नाना पटोले हे उपस्थित राहणार होते. त्यांची नावेही कार्यक्रम पत्रिकेत टाकण्यात आली होती. मात्र त्यांच्यापैकी कुणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे हा उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय होता. प्रास्ताविक सा.बां.विभागाचे मुख्य अभियंता सगणे यांनी तर संचालन अपूर्व अग्रवाल व श्रीमती देशपांडे यांनी केले. आभार कार्य.अभियंता के.पी. जनबंधू यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)
अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया आजपासून
By admin | Published: July 12, 2014 11:41 PM