महायुतीचे मिशन 45 हे आमचे होते. जास्तीत जास्त जागा येणार आहेत. एक्झिट पोल हा 100 टक्के खरा नसतो, तो अंदाज आहे. अंडरकरंट ज्या पद्धतीने चालला यात एनडीए येईल. 4 जूनला मोदी सरकार बसेल, अंदाज दिसत आहे, असे राज्याचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी अजित पवार गटाला एक किंवा शून्य जागा मिळतील या शक्यतेवर प्रतिक्रिया दिली.
गडचिरोली मतदारसंघाबाबत बोलताना आत्राम यांनी दावा करायला काही विषय नाही, जे काही खरे आहे ते दिसेल असे म्हणत काँग्रेसने ताकद लावली पण आदिवासींची जात काढल्याने याचा फटका त्यांना बसणार आहे. आदिवासी मतदार विदर्भात मोठ्या संख्यने आहे. त्यांचा मतदानावर प्रभाव आहे. वडेट्टीवार यांनी मर्यादेने बोलले पाहिजे, राजकारण आज आहे उद्या नाही. गडचिरोली जिल्ह्यात महायुतीचा उमेदवार जिंकेल, असा दावा आत्राम यांनी केला.
उद्धव ठाकरेंना नऊ जागा दाखवत असल्यावरूनही आत्राम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अखेरचा निकाल चार जूनला कळेल. ठाकरे यांच्या आज नऊ जागा दाखवत असतील, नंतर त्या कमी होतील. इंडिया आघाडीत खुर्ची एक आणि नेते 15 आहेत. 48 तास शिल्लक आहेत. मतदानाला दिसले कोणाला कोण जागा दाखवते ते. लोकांचे काम केले आहे, आमच्या सरकारने काम केले. जनता आमच्या पाठीशी राहील, असे आत्राम म्हणाले.
एक्झिट पोलचा अंदाज काय...एक्झिट पोलनुसार, बारामतीतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांचा विजय होईल. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बारामतीसह ते लढवत असलेल्या शिरूर, रायगड आणि उस्मानाबाद (धाराशिव) या चारही मतदारसंघांमध्ये पराभवाचं तोंड पाहावं लागेल. या एक्झिट पोलने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ६ जागांचा अंदाज वर्तवला असून अजित पवारांना भोपळाही फोडता येणार नसल्याचं म्हटलं आहे.
महाराष्ट्रात भाजपला १७, एकनाथ शिंदे यांची शिवसेनेला ६ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला १ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र ही १ जागा कोणती असेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीतील काँग्रेस - ८, शरद पवार यांची राष्ट्रवादी - ६ आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना जागांवर जिंकू शकते. तसंच एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.