मुंबई : सरत्या वर्षात तब्बल १,६२२ भारतीयांचे वैमानिक होण्याचे स्वप्न पूर्ण झाले असून एका वर्षात इतक्या मोठ्या संख्येने वैमानिक होण्याचा विक्रम ठरला आहे. गेल्या वर्षी १,१६५ वैमानिक झाले होते. यंदा त्या तुलनेत ४० टक्के वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या वर्षी महिला वैमानिकांच्या संख्येतही वाढ झाली असून २९३ महिलांना व्यावसायिक वैमानिकाचा परवाना जारी झाला आहे.
नागरी विमान महासंचालनालयाने (डीजीसीए) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, एका वर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक वैमानिक म्हणून परवाना जारी करण्याचा हा विक्रम ठरला आहे. यंदाच्या वर्षाचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या वर्षी एकूण ११६ महिलांना वैमानिक म्हणून परवाना जारी झाला होता, त्यात लक्षणीय वाढ होत हा आकडा आता २९३ वर गेला आहे.
तरुणांचा वाढता ओढानवीन हवाई मार्ग खुले होत असल्यामुळे विमानाने प्रवास करणाऱ्या भारतीयांच्या संख्येतदेखील विक्रमी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांना आगामी दशकभरात हजारो वैमानिकांची गरज भासणार आहे. त्यामुळे सध्या वैमानिक म्हणून करिअर करण्याकडे तरुणांचा ओढा वाढत असल्याचे विश्लेषण हवाई तज्ज्ञांनी केले आहे.
- २०१३-१४ या वर्षाच्या तुलनेत सरत्या दहा वर्षांत वैमानिक म्हणून आपले करिअर करणाऱ्या लोकांची संख्या दुप्पट झाली आहे. २०१३-१४ मध्ये ७८२ लोक वैमानिक झाले होते. देशातील सर्वच विमान कंपन्या सध्या मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहेत. - गेल्याच वर्षी इंडिगो आणि एअर इंडिया या देशातील दोन अव्वल विमान कंपन्यांनी तब्बल १,६०० नव्या विमानांची ऑर्डर दिली होती. तर, अन्य विमान कंपन्याही आपला ताफा वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत. - येत्या दशकभरात भारतीय विमान कंपन्यांच्या ताफ्यातील नवीन विमानांची संख्या दोन हजारांचा टप्पा पार करेल. - तसेच देशात नवीन विमानतळांची बांधणी होत आहे, तर दुसरीकडे अनेक नव्या आंतरराष्ट्रीय मार्गांवरदेखील भारतीय कंपन्या झेपावण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. हेलिकॉप्टर अकादमीलाही मान्यता देशात हेलिकॉप्टरच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे हेलिकॉप्टरचे प्रशिक्षण देण्यासाठी अकादमी सुरू करण्याच्या या उद्योगातील कंपन्यांच्या प्रस्तावालादेखील डीजीसीएने हिरवा कंदील दिला आहे. ही अकादमी चालू वर्षात सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.