नाशिक - मनसे येत्या काळात सत्तेच्या दिशेने वाटचाल करेल असा विश्वास पक्षाचे नेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला आहे. तर पक्षाने संधी दिल्यास मी मनसेचा पहिला खासदार होईल असं विधान सरचिटणीस वसंत मोरे यांनी केले आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज मनसेचा वर्धापन दिन सोहळा नाशिकमध्ये पार पडत आहे. राज ठाकरे आज काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
नेते संदीप देशपांडे म्हणाले की, गेले १८ वर्ष मनसेचे महाराष्ट्र सैनिक सातत्याने संघर्ष करतेय. यापुढे पक्षाची दिशा कशी असेल, कसं मार्गक्रमण करायचे याबाबत साहेब आदेश देतील. हा आमच्यासाठी भावनिक क्षण आहे. महायुतीसोबत जायचे की नाही याचा निर्णय राज ठाकरे घेतील. पण एक कार्यकर्ता म्हणून मनसे हा पक्ष सत्तेत असला पाहिजे यासाठी नक्की मार्गक्रमण करू. महाराष्ट्राच्या राजकारणातील चिखल झालाय तो कुणाला स्वच्छ करता येत असेल तर ती मनसे आहे. आणि लोकांना स्वच्छ नेता कुणी वाटत असतील तर ते राज ठाकरे आहेत असं त्यांनी सांगितले.
मी मनसेचा पहिला खासदार बनेल
लोकसभा निवडणुकीच्या अगोदर नाशिकच्या मेळाव्याला खूप महत्त्व आहे. राज ठाकरे जे भूमिका घेतात ती मनसेची भूमिका असते. मनसेचा १८ वर्धापन दिन सोहळा होतोय. याआधी मुंबईबाहेर पुणे, ठाणे इथं झाला होता यंदा नाशिकमध्ये होतोय. मनसेनं सत्तेचे तोरण जे बांधलं होतं ते नाशिकमधून बांधले होते. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीअगोदर या मेळाव्याला खूप महत्त्व आहे. मी पुणे लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. जर मला पक्षाने संधी दिली तर मनसेचा पहिला खासदार होण्याची भूमिका १०० टक्के बजावेन असं विधान वसंत मोरे यांनी केले.
दरम्यान, माझ्या प्रभागात एक आरक्षण आहे. ते आरक्षण उठवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही आहेत. ते आरक्षण हे बारामती लोकसभा मतदारसंघातले आहे. त्याबाबत सुप्रिया सुळेंनी लक्ष घालावे यासाठी मी भेटायला गेलो तेव्हा तिथे शरद पवार भेटले असा खुलासाही वसंत मोरे यांनी केला आहे.