- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम (जेईई) अॅडव्हान्स रविवार, २१ मे रोजी देशभरात होणार आहे. या परीक्षेला १ लाख ७ हजार विद्यार्थी बसणार आहेत. ‘नीट’ परीक्षेनंतर आता जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठीही ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. आयआयटीतर्फे जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी विशेष ड्रेसकोड जाहीर केला असून, विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. परीक्षेला जाताना विद्यार्थिनींना गळ््यातील हार, अंगठी, बांगड्या, लॉकेट्स, कानातले, चमकी, हेअर पिन, हेअर बँड घालण्यास मनाई आहे. तर विद्यार्थ्यांना बूट, फूल स्लिव्ह शर्ट घालण्यास बंदी आहे. त्याचप्रमाणे, स्मार्ट वॉच, लॅपटॉप, वायफाय डिवाइस, हँड बँड, मोठी बटणे असलेले कपडे यालाही बंदी घालण्यात आली आहे. पूर्ण हाताचे कपडे घालण्यास मनाई करण्यात आली आहे. कॉपी प्रकरणांना आळा घालण्यासाठी ड्रेसकोडचा नियम लागू करण्यात आला आहे. मुख्य परीक्षेनंतर ‘अॅडव्हान्स’साठी संधीआयआयटी, राजीव गांधी इन्स्टिट्यूट आॅफ पेट्रोलियम टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट्स आॅफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च येथे प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना जेईई परीक्षा द्यावी लागते. जेईई मेनमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अॅडव्हान्स परीक्षेला बसण्याची संधी मिळते. या परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांचा समावेश असतो. जेईई अॅडव्हान्स परीक्षेला दोन पेपर असतात. प्रत्येक पेपर हा तीन तासांचा असतो. या दोन्ही पेपरमध्ये वेगवेगळे सेक्शन असतात. देशभरातील विविध केंद्रांवर रविवारी ही परीक्षा होणार आहे.