सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे १२ जानेवारी रोजी जिजामाता जन्मोत्सव साजरा होत असून, सूर्योदयी राजवाड्यात मासाहेबांना वंदन केले जाणार आहे. मराठा सेवा संघाच्यावतीने जिजाऊसृष्टी येथे सकाळी ९ वाजेपासून शिवधर्म ध्वजारोहणाने कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे. जिजाऊ मासाहेबांची ही ४१८ वी जयंती असून, मराठा सेवा संघाच्यावतीने दरवर्षी १२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी देशभरातून लाखो जिजाऊभक्त या उत्सवासाठी येत असतात. जिजाऊ जन्मोत्सवाची सुरुवात सावित्रीमाईच्या जयंतीपासून करण्यात येते. दरम्यान, ३ ते १२ जानेवारीपयर्ंत दशरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. १२ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता जिजाऊ जन्मस्थळावर जिजाऊ पुजनाने जिजाऊ जन्मोत्सव सोहळय़ाला प्रारंभ होणार आहे, तर शासकीय कार्यक्रम सकाळी ६.४५ वाजता होणार आहेत. जि.प. अध्यक्ष अलका खंदारे यांच्या हस्ते जिजाऊ पूजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.प्रतापराव जाधव हे राहणार आहेत. आ.डॉ. शशिकांत खेडेकर, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिजाऊसृष्टीवर जनसागर जिजाऊ सृष्टी येथे सकाळी ९ वाजेपासून शिवधर्म ध्वजारोहणाने कार्यक्रमाला प्रारंभ होईल. यामध्ये शाहिरी, पोवाडे, प्रबोधनपर व्याख्यानमाला, सांस्कृतिक , क्रीडा, कला, संगीत, नृत्य इत्यादी विविध कार्यक्रम होणार आहेत. प्रकाशन सोहळा, सामूहिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे. दुपारी ३ नंतर शिवधर्मपीठावरून मुख्य कार्यक्रम सुरू होईल. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अँड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनात विविध कक्षांचे पदाधिकारी परिङ्म्रम घेत आहेत.
मातृतीर्थावर आज जिजाऊ जन्मोत्सव सोहळा
By admin | Published: January 12, 2016 1:32 AM