मुंबई : राज्यातील पायाभूत सुविधांची सद्य:स्थिती व भविष्यातील नियोजनाचा वेध मंगळवारी होणाऱ्या ‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’मध्ये घेण्यात येणार आहे. मुंबईतील हॉटेल ‘ग्रॅण्ड हयात’मध्ये होणाऱ्या या कॉनक्लेव्हचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, तर समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे.
‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’मध्ये रस्ते, जलवाहतूक आणि राज्यातील पायाभूत सुविधा या विषयांवर सविस्तर आणि उद्बोधक चर्चा होणार आहे. त्यातून राज्याच्या व देशाच्या प्रगतीला चालना देणाऱ्या पायाभूत सुविधांच्या विकासाची दिशा स्पष्ट होईल. देशभरातील रस्ते-महामार्ग, बंदरे आणि जहाज वाहतूक आणि व्हिजन महाराष्ट्र अशा तीन विषयांवर मंथन होणार असून दिवसभर चालणाऱ्या या चर्चासत्रांत ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांच्यासह पायाभूत सुविधा क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी सहभागी होणार आहेत.
रस्ते विकासाच्या चर्चासत्रात ‘येस बँक’चे संजय पालवे, ‘एल अॅण्ड टी फायनान्स लिमिटेड’चे वाय.एम. देवस्थळी, ‘एनएचएआय’चे राघव चंद्रा, ‘एमईपी इन्फ्रा’चे जयंत म्हैसकर, ‘टॉप वर्थ’चे अभय लोढा यांचा समावेश असेल.बंदर विकासाच्या चर्चासत्रात येस बँकेचे विनोद बहेती, मुंबई पोर्ट ट्रस्टचे संजय भाटिया, केंद्र सरकारचे प्रतिनिधी आर. के. अगरवाल, ‘इनलॅण्ड वॉटरवेज’चे परवीर पांडे, ‘जेएनपीटी’चे नीरज बन्सल यांचा सहभाग असेल. राज्यातील पायाभूत सुविधा आणि व्हिजन महाराष्ट्र या चर्चासत्रात ‘एमआयडीसी’चे संजय सेठी, ‘सिडको’चे भूषण गगराणी, ‘एमएमआरडीए’चे यू. पी. एस. मदान, ‘एमएसआरडीसी’चे आर. एल. मोपलवार, ‘मुंबई मेट्रो-३’च्या अश्विनी भिडे, महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी मिलिंद म्हैसकर या तज्ज्ञांचा समावेश असेल. तिन्ही सत्रांनंतर प्रश्नोत्तरांचे सत्रही होईल. हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठी आहे. या विषयांवर होणार चर्चा रोड इन्फ्रास्ट्रक्चर : जमीन संपादन, प्रकल्प अर्थसाहाय्य व आक्षेप निराकरणबंदरे आणि जहाज वाहतूक : बंदर जोडणी योजना, देशांतर्गत जलमार्ग, बंदर औद्योगिकीकरण आणि सागरमाला