ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 23 - अनेक जिल्ह्यांत यशस्वी झालेल्या मराठा क्रांती मोर्चाचं वादळ आज कोकणात धडकणार आहे. कोकणात पालघर, रायगड, सिंधुदुर्गात आज मराठा समाजाचे भव्य मोर्चे निघणार आहेत. यानिमित्तानं मराठा समाज सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये एकवटणार आहे. रायगडच्या माणगावजवळील निजामपूर रोडवरून या भव्य मोर्चाची सुरुवात होणार आहे. या मोर्च्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले आणि स्थानिक आमदार हजेरी लावणार आहेत.तर आगरी, आदिवासी, शिलोत्तरी, मच्छीमार, मुस्लीम आदी समाजांचे प्राबल्य असलेल्या पालघरमध्येही मराठा बांधव विक्रमी मोर्चा काढणार आहेत. दुपारी १ वाजता स.तु. कदम हायस्कूलच्या मैदानावरून सुरू होणारा मोर्चा दुपारी ३ च्या सुमारास आर्यन विद्यालयाच्या मैदानावर पोहोचणार आहे. एक लाखांची क्षमता असणारे हे मैदान व आसपासचा परिसरही हा मोर्चा व्यापून टाकण्याची शक्यता आहे. या मोर्चाला आगरी समाज, मुस्लीम समाज यांनी पाठिंबा दिला आहे. याशिवाय शिवसेना, बहुजन विकास आघाडी यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. सकाळी ९ पासूनच संपूर्ण जिल्ह्यातून व आसपासच्या परिसरातून हजारोंच्या संख्येने समाजबांधव स. तु. कदम विद्यालयाच्या प्रांगणात जमण्यास सुरुवात होणार आहे. मोर्चा सुरू होईपर्यंत काही वक्ते या समुदायासमोर मराठेशाहीच्या गौरवशाली इतिहासावर भाषणे करणार आहेत. यातील वक्ते छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज व अन्य ऐतिहासिक विषयांवर अल्प काळ आपले विचार मांडतील. वक्ते व यांच्या भाषणाचा विषय याची पूर्णपणे खातरजमा करून त्यांची वेळ संयोजकांनी निश्चित केली आहे. यात कोणताही वक्ता राजकीय भाषणे, आरोप, प्रत्यारोप, टीका, टिप्पणी करणार नाही, याची खबरदारी घेतली गेली आहे.तर दुसरीकडे सिंधुदुर्गात ओरोस फाटा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्च्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नारायण राणे सहभागी होणार आहेत. तसेच पालकमंत्री दीपक केसरकर आणि आमदार वैभव नाईकही या मोर्च्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. सभास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अग्निशामक दलाच्या गाड्या आणि अँब्युलन्सही दाखल झाल्या आहेत. बॉम्बशोधक आणि नाशक पथकाकडूनही सभास्थळाची तपासणी करण्यात आली आहे. या मोर्च्यात लाखोंच्या संख्येनं मराठी बांधवांसह सामाजिक आणि राजकीय पुढारीही सहभागी होणार आहेत.
कोकणात आज मराठा समाज एकवटणार, भव्य मोर्चाचं आयोजन
By admin | Published: October 23, 2016 8:46 AM