(स्थळ : स्वर्ग अन् नरकाचं प्रवेशद्वार. प्रत्येकाच्या पापा-पुण्याचा हिशोब करून ज्याला-त्याला ‘आत’ सोडण्यात चित्रगुप्ताची माणसं दंग. नेते, कार्यकर्ते अन् सर्वसामान्य मतदारही रांगेत उभारलेले.)
चित्रगुप्त : सेवका ùù. हे दोन ‘खादी’धारी टोपीवाले रांग मोडून पुढं का येताहेत?
सेवक : (डोकं खाजवत) ‘रांग ही केवळ सर्वसामान्य जनतेसाठीच असते,’ असा गोड गैरसमज आयुष्यभर या नेत्यांनी करून घेतलेला. म्हणूनच ‘वर’ आल्यानंतरही ‘पृथ्वीतलावरची झुंडशाही’ काही यांच्या डोक्यातून जाईनाशी झालीय महाराजùù.
चित्रगुप्त : (रागानं) यांच्या पाप-पुण्याचा हिशोब केलाय का? पाठवून द्या त्यांना त्यांच्या-त्यांच्या कर्माप्रमाणं.
सेवक : (गोंधळून) महाराजùù. यांनी आजपावेतो सारा व्यवहार ‘बेहिशेबी’च ठेवलेला; त्यामुळं यांच्या नोंदी काही सापडेनात.
चित्रगुप्त : पण जे केलं, ते तरी पुण्याचं होतं का?
पहिला नेता : (लगेच पुढं सरसावत) होय, मी दर पाच वर्षानी गोरगरिबांना दोन हजार साडय़ा अन् एक हजार चादरी वाटल्या.
दुसरा नेता : (पहिल्या नेत्याकडं तुच्छतेनं बघत) ही स्टाईल खूùùप जुनी झाली. मी तर तीन-साडेतीन हजार मोबाईल तरुणांना फुकटात वाटलेत. दहा-पंधरा हजार लोकांच्या पंगतीही भरवल्यात.
चित्रगुप्त : (वहीतल्या नोंदी तपासत आश्चर्यानं) ऑँ ? एवढं मोठं कार्य जर तुम्ही केलं असेल, तर ते पुण्याच्या यादीत का नाही?
सेवक : (लगेच खुलासा करत) ‘लोकांना मोफत भेटवस्तू देणं अन् त्यांना खाऊ-पिऊ घालणं’ हे पुण्य नव्हे महाराजùù. हा तर त्यांनी जनतेसोबत केलेला ‘सरळसोट धंदेवाईक व्यवहार’ होता. भेटवस्तूची लाच देऊन पुन्हा पुढची पाच वर्षे ‘मलिदा लाटण्याचा’ जणू त्यांच्यासाठी अधिकृत परवानाच होता.
चित्रगुप्त : म्हणजे हे तर सर्वात मोठे पापच की ! जाऊ दे रे ùù यांना नरकाùùत.
सेवक : (सर्वसामान्य कार्यकत्र्याला घेऊन येत.) याच्या नावावर पुण्य काहीच नाही. अत्यंत गरीब कार्यकर्ता. रोजी-रोटी हातावरच. एक महिन्यापासून अनेक राजकीय नेत्यांच्या संगतीत राहू लागलेला. सकाळी एकाच्या पदयात्रेत. दुपारी दुस:याच्या रॅलीत, तर संध्याकाळी तिस:याच्याच प्रचारसभेत.
चित्रगुप्त : (डोळे विस्फारत) याला तर विश्वासघात म्हणतात. हे तर खूप मोठ्ठं पाùùप..
कार्यकर्ता : (रडवेल्या चेह:यानं हात जोडून गयावया करत.) महाराùùज. आम्ही ‘सतरंजी’ उचलणारे साधे कार्यकर्ते. ते ‘शतरंज’ खेळणारे भारी नेते. भावाची टपरी अधिकृत करायला पैसे नव्हते म्हणून ‘दोन तासाला पाचशे रुपये’ मी कमावले. पंधरा दिवस फुकटची बाटली फोडली. नळी चाखली; पण निवडणुकीनंतर पुन्हा बेकार. पुन्हा उपाशीपोटी दारोदार.
चित्रगुप्त : (गहिवरून) अरेùù बस्स कर याùùर. अब मुङो भी रुलायेगा क्या? याला स्वर्गात घेऊन जाùùरे.
सेवक : (अजून एकाला पुढं करत) महाराùùज याचं नाव ‘सोशल मीडिया वर्कर’.
चित्रगुप्त : (डोळे विस्फारत) आजर्पयत ‘सोशल-वर्कर’ माहीत होते..पण हा प्रकार मी पहिल्यांदाच पाहतोय.
सेवक : या माणसाच्या नावावर ‘पाप’ही नाही अन् ‘पुण्य’पण; कारण ‘लोकशाही’ अन् ‘माणुसकी’च्या पोस्ट अपलोड करण्यातच याची जिंदगानी गेलेली.
सोशल मीडिया वर्कर : (हातातल्या मोबाईलवर ‘चित्रगुप्त’सोबतचा ‘सेल्फी फोटो’ टाकून पटापटा चॅटिंग करत) नाऊ आय अॅम विथ चित्रगुप्त. इटस् नाईस मीटिंग विथ हीम. प्लीजùù फॉरवर्ड टू ऑल धीस मेसेज. जल्दी-जल्दी भेजो सबको.
सेवक : (हळूच कानात कुजबुजत) महाराùùज.. ‘देश कसा रसातळाला चाललाय!’ यावर रोज बाता मारणा:या या पट्टय़ानं मतदान मात्र, आजर्पयत एकदाही केलेलं नाही. उलट मतदानाची प्रत्येक सुट्टी ‘आऊटडोअर पिकनिक’मध्ये एन्जॉय करण्यातच घालावलेली.
चित्रगुप्त : (रागानं थरथरत) काय म्हणता काय? ताबडतोब याला ‘लाँùùग लाईफ नरकात’ पाठवा!
- सचिन जवळकोटे