ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 30 - शिवसेना आणि भाजपामधील संबंध विकोपाला गेले आहेत. मुंबईतील सभांमध्ये औकात दाखवण्यापासून पाणी पाजण्यापर्यंतची भाषा वापरण्यात आली. 25 वर्ष भाजपासोबत सडलो, यापुढे कुठेही युती नाही, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर भाजपा मेळाव्यात शिवसेनेला जागा दाखवून देण्याचे आव्हान मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्यानंतर शिवसेनेही मुख्यमंत्र्यांविरोधात दंड थोपटले आहेत. शिवसेनेने मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा सामनातून खरपूस समाचार घेतला आहे. शिवसेना जळता लोळ आहे. आमच्या नावाने शंख कराल तर आज फक्त घसा बसला. उद्या घरी बसावं लागेल, असा पाठिंबा काढण्याचा सूचक इशारा फडणवीसांना दिला आहे.महापालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना-भाजपा परस्परांवर चिखलफेक करत उणीदुणी काढत आहेत. अयोध्येतील राममंदिराची घोषणा हे लोक 28 वर्ष करीत आहेत. केंद्रात सत्ता आल्यापासून अयोध्येत राम मंदिर बनेल, असे भाजपाला वाटते. कदाचित हरवलेल्या विटा त्यांना सापडत असतील. समान नागरी कायद्याच्या बाबतीत गंडवागंडवी सुरूच आहे. मुंबईसह महाराष्ट्र यांना धनदांडग्याच्या घशात घालायचाच आहे, अशी टीकेची झोड शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर करण्यात आली आहे. फडणवीस दुधात हळद प्या बरे वाटेल -महानगरपालिका निवडणुकीत भाजपा बसेलच पण त्याआधीच त्यांचे घसे बसू लागले आहेत. अखंड महाराष्ट्राची जबाबदारी जापर्यंत त्यांच्यावर आहे तोपर्यंत त्यांना ती संभाळावी लागेल. त्यांनी अधूनमधून हळद टाकून गरम दूध प्यावे, त्यामुळे घशाला आराम मिळेल. गरम पाण्यात मध आणि लिंबू पिळून प्राशन केल्यावरही त्यांच्या घशाला आराम मिळू शकेल, असा उपरोधिक सल्ला सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या घशासाठी रामदेवबाबाचे प्रॉडक्ट पंतजलीचीही सूचना देण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी जे पचेल तेच बोलावेनिवडणुकांत ज्यांची नरडी जास्त गरमागरम होतात व टिकतात त्यांचे बरे चालते. त्यांना मुंबईसह दहा महानगरपालिका हद्दीत प्रचारासाठी घसा फोडायचा आहे. घसा फोडायचा म्हणजे शिवसेनेच्या नावाने शंख करायचा आहे. शिवसेना म्हणजे गुंडांचा पक्ष, खंडण्या घेणाऱयांचा पक्ष असा सूर लावताना त्यांचा घसा पुन्हा बिघडला तर कसे व्हायचे? म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी जे पचेल तेच बोलावे.- निवडणुका जिंकण्यासाठी आम्हाला कलानी-भोसल्यांसारख्या गुंडापुंडांची, खंडणीखोरांची कवचकुंडले लागत नाहीत. ज्या पक्षाचा राठ्रीय अध्यक्ष टीव्ही कॅमेऱयांसमोर खंडणी घेताना पकडला गेला त्या पक्षाच्या लोकांनी शिवसेनेवर हे असले घाणेरडे आरोप करावेत हा विनोदच आहे.बलात्कार, खून, लफंगेगिरी, चोऱया व भ्रष्टाचार केल्याचे दाखले दाखवा व पक्षात प्रवेश घेऊन पद मिळवा असे जे पॅकेज भाजप मंडळींनी जाहीर केले आहे ते कोणत्या चारित्र्यात व साधनशूचितेत बसते?शिवाजी महाराजांनाही लुटारू ठरविणारी अवलाद या भूमीत निपजली म्हणून शिवरायांचे तेज कमी झाले नाही. सीमा प्रश्नासाठी शिवसेनेने ६९ हुतात्मे दिले. हा त्याग फक्त शिवसेनाच करू शकते.