मुंबई: मौखिक आरोग्याशी निगडीत आजारांचा गांभिर्याने विचार करुन राज्यात 1 ते 31 डिसेंबर या कालावधीत मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ उद्या शुक्रवार दि. 1 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता मालवणी मालाड येथील सामान्य रुग्णालयात करण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.
मंत्री डॉ. सावंत म्हणाले, या कालावधीत संपूर्ण राज्यात 30 वर्षावरील स्त्री व पुरुषांची मौखिक तपासणी केली जाणार आहे. ही तपासणी सर्व शासकीय, महापालिका, नगरपालिका दवाखाने येथे मोफत उपलब्ध असणार आहे. तसेच गाव पातळीवर ही तपासणी एएनएम व एमपीडब्लू यांच्यामार्फत करुन गरजू लोकांना पुढील उपचारासाठी नजीकच्या दवाखान्यात पाठविण्यात येणार आहे. यामध्ये उपचार हे पूर्णत: नि:शुल्क असणार आहेत. ही मोहीम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्था जसे इंडियन डेंटल असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन कॅन्सर सोसायटी, लायन्स, रोटरी क्लब तसेच शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालये सहकार्य करणार आहेत. विशेष सहकार्य टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथील तांत्रिक तज्ज्ञ डॉक्टर करणार आहेत. मोहीमेदरम्यान संदर्भित झालेल्या रुग्णांना पुढील 6 महिन्याच्या आत अंतिम निदान व उपचार करण्यात येईल.
मंत्री डॉ. सावंत म्हणाले, आपल्या देशात प्रामुख्याने आढळणाऱ्या कॅन्सरमध्ये स्तनाचा कॅन्सर, गर्भाशय मुख कॅन्सर आणि मुख कॅन्सर (तोंडाचा कॅन्सर) यांचा समावेश होतो. यामध्ये स्त्री व पुरुषांमध्ये तोंडाचा कॅन्सर जास्त प्रमाणात आढळतो. या कॅन्सरमध्ये लवकर निदान (पहिल्या अवस्थेत) आणि वेळेत योग्य ते उपचार केल्यास या कॅन्सरचे बरे होण्याचे प्रमाण हे साधारणत: 70 ते 75 टक्के असते. त्याचप्रमाणे या कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूचा दर जवळ जवळ 60 ते 65 टक्केने कमी होतो. यासाठी लवकरात लवकर तोंडाच्या कॅन्सरचे निदान करणे गरजेचे आहे. कारण तोंडाच्या कॅन्सरच्या अगोदरची लक्षणे तोंडात चट्टा किंवा व्रण या रुपात दिसतात. जे उपचाराद्वारे पूर्ण बरे होऊ शकतात व त्याचे रुपांतर कॅन्सरमध्ये होण्यापासून आपण त्यांना वाचवू शकतो. म्हणून तोंडात कॅन्सरची पुर्वरुपातील लक्षणे चट्टा आहे की नाही हे तज्ज्ञांकडून तपासून घेणे गरजेचे आहे. यासाठी राज्यात हे अभियान प्रभावीपणे राबविले जाईल. लोकांनीही या मोहीमेत सहभागी होऊन मौखिक तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी केले आहे.