मुंबई : मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे, तर पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरीवली ते नायगाव स्थानकादरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.रेल्वेच्या रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणा सर्व स्लीपरची पाहणी, रुळांमधील खडी बदलणे या कामांसाठी रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक घेण्यात येतो. रविवारी मध्य रेल्वेवरील मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० पर्यंत अप जलद मार्गावर ही कामे करण्यात येणार आहेत. परिणामी, अप जलद मार्गावरील वाहतूक अप धिम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. या कालावधीत लोकल सुमारे २० मिनिटे उशिराने धावतील. डाउन जलद मार्गावर सीएसएमटीहून सकाळी १०.०८ ते दु. २.४२ या कालावधीत लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड स्थानकावर थांबतील. ब्लॉक काळात अप आणि डाउन दिशेकडील लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावतील. लांब पल्ल्यांच्या मेल-एक्स्प्रेसलाही या ब्लॉकचा फटका बसणार आहे. सकाळी ११ ते ६ वाजेपर्यंत मेल-एक्स्प्रेस धिम्या मार्गावर वळविण्यात येतील.पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते नायगाव स्थानकामध्ये सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अप आणि डाउन जलद मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात सर्व अप आणि डाउन जलद लोकल विरार-वसई ते बोरीवलीपर्यंत अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील.>दिवा येथून सुटणार दादर-रत्नागिरी पॅसेंजरब्लॉक काळात रत्नागिरी-दादर पॅसेंजरला अंतिम थांबा दिवा स्थानकात देण्यात येणार आहे. परिणामी, परतीचा प्रवासदेखील दिवा स्थानकातून सुरू होणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनातर्फे दादर स्थानकातून ठाणे करीता दुपारी ३.४० मिनिटांनी आणि ठाण्यातून दुपारी ४.०६ मिनिटांनी विशेष लोकल सोडण्यात येतील.
आज प्रवाशांचे मेगा‘हाल’, हार्बरवरील ब्लॉक रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 6:38 AM