पुणे : महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीने शहराला आजपासून दररोज एक वेळ पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या भागाला कोणत्या वेळी पाणी सोडले जाणार याचे नियोजन करून वेळापत्रक तयार करण्याचे काम पाणीपुरवठा विभागातर्फे सुरू असून, ते सोमवारी अंतिम होण्याची शक्यता आहे.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाल्यानंतर पाणीकपात रद्द करण्याची मागणी राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्थांकडून सातत्याने केली जात होती. पालकमंत्र्यांनी पाणीकपात रद्द करण्यासाठी आणखी वेळ लागणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर महापौरांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे आदी पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. यापार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी शनिवारी कालवा समितीची बैठक घेऊन पाणीकपात रद्द केल्याची घोषणा केली. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार धरणांमधून शहरासाठी दररोज आता दररोज १२०० एमएलडी इतका पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पाणीकपात सुरू असताना दररोज ८५० एमएलडी इतके पाणी दिले जात होते. एकदिवसाआड पाणीपुरवठ्यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रत्येक भागानुसार वेळापत्रक निश्चित केले होते. आता दररोज पाणीपुरवठा करायचा असल्याने प्रत्येक भागाला कोणत्या वेळी पाणी सोडायचे याचे नियोजन करण्याचे काम पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सुरू आहे. सोमवारी वेळापत्रकाचे काम पूर्ण होईल अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली.
पुणेकरांना आजपासून दररोज एक वेळ पाणी
By admin | Published: August 08, 2016 1:47 AM