पुणे : विठ्ठलाच्या भेटीची आस घेऊन निघालेल्या संत ज्ञानेश्वरमहाराज व संत तुकाराममहाराज यांच्या पालख्यांचे उद्या (दि. २९) पुणे शहरात आगमन होणार आहे. यानिमित्त शहरात पुणे महापालिकेच्या वतीने आणि विविध संस्था-संघटनांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.संत ज्ञानेश्वरमहाराजांची पालखी उद्या सकाळी आळंदीतून निघून सायंकाळी ५च्या सुमारास पाटील इस्टेट येथील संगमवाडी पुलामार्गे पुणे शहरात आगमन करेल. तर, संत तुकाराममहाराजांची पालखी उद्या सकाळी निगडी येथून निघून बोपोडीमार्गे पुणे शहरात आगमन करेल. पुणे महापालिकेच्या वतीने या पालख्यांचे स्वागत पाटील इस्टेट येथे करण्यात येईल. या पालख्या संचेती चौक, शिवाजीनगर मार्गे फर्ग्युसन रस्ता, डेक्कन, अलका चौक, लक्ष्मी रस्ता मार्गे मुक्कामस्थळी रात्री पोहोचतील. त्याअगोदर फर्ग्युसन रस्त्यावरील ज्ञानेश्वरमहाराज पादुका मंदिर आणि तुकाराममहाराज पादुका मंदिरात या पालख्यांच्या आरत्या करण्यात येतील. संत ज्ञानेश्वरमहाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात आणि संत तुकाराममहाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्कामासाठी थांबेल. वाहतुकीत बदलपालखीमार्गावर घातपातविरोधी पथक, बॉम्बशोधक पथक तैनात करण्यात आली आहेत. शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पालख्या बोपोडी, जुना मुंबई-पुणे महामार्ग, दिघी, भोसरी, विश्रांतवाडी, पाटील इस्टेट रस्ता, शिवाजीनगर, फर्ग्युसन रस्ता, डेक्कन, अलका चौक, लक्ष्मी रस्ता या मार्गे जाणार असल्याने टप्प्याटप्प्याने रस्ते बंद करण्यात येणार आहेत.
आज पुणे होणार ‘वारीमय’!
By admin | Published: June 29, 2016 12:47 AM