मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर रविवारी सकाळी ११ वाजता होणार असून, फेरबदलात काही मंत्र्यांना घरी बसविण्यात येणार आहे. नऊ जणांना मंत्री म्हणून शपथ दिली जाणार आहे. सोमवारपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे.सध्या मंत्रिमंडळात २२ कॅबिनेट आणि १६ राज्यमंत्री असून, आणखी पाच रिकाम्या जागा भरणे शक्य आहे. शिवसेनेला दोन व रिपाइंला (आठवले गट) एक मंत्रिपद मिळेल, तर भाजपच्या कोट्यातून सहा नावे आली आहेत. त्यामुळे विद्यमान किमान चार मंत्र्यांना वगळले जाणे निश्चित आहे. वगळण्यात येणाऱ्यांत गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले हे कॅबिनेट मंत्री आहेत. तर अंबरिश आत्राम, प्रवीण पोटे, दिलीप कांबळे, विद्या ठाकूर यांनाही काढले जाऊ शकते. राधाकृष्ण विखे यांना भाजपमधूनच विरोध होता, पण त्यांना मंत्रिपद देण्यासाठी फडणवीस यांनी मध्यस्थी केली. भाजपकडून मुंबईचे अध्यक्ष अॅड. आशिष शेलार, अनिल बोंडे, संजय कुटे, अतुल सावे, योगेश सागर, सुरेश खाडे, परिणय फुके यांची नावे निश्चित झाल्याचे समजते. शिवसेनेमधून अनिल परब वा तानाजी सावंत व राष्ट्रवादी सोडून आलेले जयदत्त क्षीरसागर यांना संधी मिळेल, अशी चर्चा आहे. केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपाइंचे नेते अविनाश महातेकर यांनाही मंत्रिपद मिळेल.मुख्यमंत्री फडणवीस शनिवारी दिल्लीत जातील व मंत्रिमंडळाच्या यादीवर शिक्कामोर्तब करतील, रविवारी विस्तार होईल, हे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. मुख्यमंत्री शुक्रवारी रात्री अचानक उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीला गेले. तेथून बाहेर पडताच त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा झाल्याचे टिष्ट्वट केले होते. ते शनिवारी दिल्लीत पक्षाध्यक्ष अमित शहा यांना भेटले व विस्तारावर शिक्कामोर्तब झाले.शपथविधीला उद्धव ठाकरे नाहीतशिवसेना पक्षप्रमुख उद्या होणाºया शपथविधी सोहळ्याला हजर राहणार नाहीत. ते शिवसेनेच्या १८ खासदारांसह अयोध्येला जाणार आहेत. शपथविधीच्या वेळीच काँग्रेस, राष्टÑवादीसह विरोधकांची बैठक विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर होणार आहे. त्यामुळे विरोधकही शपथविधीला हजर राहणार नाहीत. सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा विरोधकांनी निर्णय घेतला आहे. नव्या मंत्र्यांसह सोमवारपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे.
राज्य मंत्रिमंडळात आज फेरबदल आणि विस्तार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 4:35 AM