मुंबई : १९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या अबू सालेमसह, इतर दोषींच्या शिक्षेबाबत विशेष टाडा न्यायालय आज निर्णय देणार आहे.१६ जूनला विशेष टाडा न्यायालयाने १९९३ साखळी बॉम्बस्फोटांच्या दुसºया टप्प्यातील आरोपी, अबू सालेमसह सहा जणांना दोषी ठरविले. त्यात २८ जून रोजी हृदयविकाराने मृत्यू पावलेल्या मुस्तफा डोसाचाही समावेश होता. अबू सालेमसह फिरोज खान, मोहम्मद ताहिर मर्चंट उर्फ ताहिर टकल्या, करीमुल्ला खान आणि रियाझ अहमद सिद्दिकी यांना दोषी ठरविण्यात आले, तर अब्दुल कय्युम अन्सारी याची सुटका करण्यात आली होती.१९९३ साखळी बॉम्बस्फोटातील अटक आरोपींना दोषी ठरविल्यानंतर विशेष सीबीआय वकिलांनी सालेम सोडून, सर्वांना फाशीची शिक्षा ठोठावण्याची विनंती केली. पोर्तुगाल व भारत यांच्यातील करारानुसार, सालेमला फाशीची शिक्षा देता येणार नाही. त्यामुळे त्याला जन्मठेप द्यावी, अशी विनंती विशेष सीबीआय वकिलांनी विशेष टाडा न्यायालयाला केली. तर बचाव पक्षाच्या वकिलांनी या सर्वांना कमीतकमी शिक्षा देण्याची विनंती केली आहे.१२ मार्च १९९३ रोजी मुंबईतील १३ मुख्य ठिकाणांवर साखळी बॉम्बस्फोट करण्यात आले. यात २५७ जणांचा मृत्यू व ७१३ लोक गंभीर जखमी झाले. तर सुमारे २७ कोटी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले.
अबू सालेमसह १९९३च्या स्फोटांतील दोषींचा आज ‘निकाल’, विशेष टाडा न्यायालय आज देणार निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 4:06 AM