आळंदी : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांच्या ७१८व्या संजीवन समाधी सोहळा दिनानिमित्त बुधवारी अलंकापुरीत ‘श्रीं’ची वैभवी रथोत्सव मिरवणूक ‘माऊली-माऊली’च्या जयघोषात उत्साहात पार पडली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी ‘श्रीं’चे दर्शन घेण्यासाठी नगरप्रदक्षिणा मार्गावर गर्दी केली होती. गुरुवारी माऊलींच्या संजीवन सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम होईल.सायंकाळी चारच्या सुमारास ‘श्रीं’ची पालखी हरिनामाच्या गजरात मंदिराच्या महाद्वारातून नगरप्रदक्षिणेसाठी निघाली. शनिमंदिरमार्गे गोपाळपुऱ्यातील इनामदारांच्या श्रीकृष्ण मंदिरात ती आली. परंपरेनुसार इनामदार कुटुंबीयांच्या वतीने माऊलींची विधिवत पूजा करून माऊलींचा चांदीचा मुखवटा नगरप्रदक्षिणेसाठी सजविलेल्या रथात विराजमान करण्यात आला. विविध रंगबेरंगी आकर्षक वस्त्रालंकारांनी सजविलेले ‘श्रीं’चे रूप भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. वीणा, टाळ-मृदंगाचा निनाद आणि हरिनामाच्या जयघोषात हा वैभवी राथोत्सव सोहळा मंदिराकडे मार्गस्थ झाला. (वार्ताहर)
आज संजीवन समाधी सोहळा
By admin | Published: November 20, 2014 2:33 AM