दासगाव : कोणत्याही मंदिरामध्ये गेल्यानंतर ब्राह्मण अगर जंगम समाजाच्या माणसांना पूजेचा मान असतो. या परंपरेला छेद देत दासगावचे काळभैरव-जोगेश्वरी मंदिर वेगळी वाटचाल करीत आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून या मंदिरातील पूजेचा सर्व मान हा येथील कुंभार समाजातील कुटुंबीयांनाच मिळतो. या अनोख्या परंपरेसाठी हे मंदिर सर्वश्रुत आहे.दासगाव येथील काळभैरव-जोगेश्वरी देवस्थानाची जत्रा गुढीपाडव्यानंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या वर्षी ३ एप्रिल सोमवारी हा जत्रोत्सव साजरा होणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. जत्रोत्सव म्हटला की धार्मिक पूजा, जल्लोष, काठ्या, पालख्या, खाऊ आणि खेळण्यांची दुकाने हे सर्व आलेच. मात्र दासगावचे देवस्थान यापेक्षा काही तरी वेगळा संदेश समाजाला देत सर्वधर्मसमभावाची शिकवण दासगावच्या या मंदिरातून दिली जात असून सर्व माणसेही सारखीच आहेत, हे येथील बारमाही पूजेतून जगाला दाखवण्याचे काम काळभैरव-जोगेश्वरी देवस्थान करीत आहे. दासगाव येथील मंदिरात बारमाही पूजेचा मान हा येथील कुंभार समाजाच्या चांढवेकर कुटुंबीयांना मिळत असून, गेल्या अनेक पिढ्यांपासून इमाने इतबारे ही जबाबदारी पार पाडत आहेत. कोणत्याही छोट्या-मोठ्या मंदिरात अगर देवस्थानात गेले तर येथील देवी-देवतांची पूजाही ब्राह्मण अगर जंगम समाजाच्या माणसांमार्फत करण्याची प्रथा आहे. यामधूनच एक सामाजिक दुही निर्माण झाली होती. या दुहीला छेद देत दासगावच्या काळभैरव-जोगेश्वरी मंदिरात कुंभार समाजाला पूजेचा मान देण्यात आला आहे. जत्रोत्सवाच्या काळात संपूर्ण गाव या मंदिरात एकवटतो. उत्सवाच्या आदल्या दिवशी शिवारातील देव-देवतांचा मानपान दिला जातो, त्याची विधिवत पूजा केली जाते. याच पूजेने जत्रोत्सवाला प्रारंभ होतो. प्रत्यक्षात जत्रेच्या दिवशी संध्याकाळी काळभैरव-जोगेश्वरीच्या मंदिरात चौक भरला जातो. या पारंपरिक पूजेनंतर बगाड फिरते (लाट फिरते) आणि जत्रेची खरी धूम सुरू होते. रात्री ९ वाजल्यापासून परिसरातील वीर, गोठे, वामणे, सव या गावांतील पालख्या आणि काठ्या येतात. गावामध्ये आल्यानंतर काही अंतरापासून या पालखीला पायघडीचा मान असतो. मंदिरापर्यंत पायघड्या घालत आणले जाते, या पायघड्याचा मान येथील परिट समाजालाच मिळतो. पालखी मंदिरामध्ये आल्यानंतर पुन्हा बगाड फिरवून या पालखीला मान देऊन पुन्हा रात्रीच्या कार्यक्रमाला सुरुवात केली जाते. दरवर्षीप्रमाणे रात्रीच्या कार्यक्रमामध्ये यंदा शक्ती-तुरा या तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. (वार्ताहर)सर्वधर्मसमभावाचा संदेश : दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सर्व आलेल्या गावांतील पालख्या, काठ्यांची एक भव्य मिरवणूक मंदिरापासून काढण्यात येते. त्यानंतर आलेल्या भाविकांना नारळाचा मानपान देऊन जत्रेची सांगता करण्यात येते. काळभैरव-जोगेश्वरी मंदिराच्या जत्रोत्सवानिमित्ताने सर्व धर्म जाती धर्मांना समानतेचा मान कुंभार समाजाला पूजेचा मान दिला जातो. त्याचप्रमाणे परिट समाजाला सवच्या पालखीला पायघड्या घालण्याचा मान मिळतो, तर मुस्लीम समाजाच्या दर्ग्याला मानपानाचा नारळ विडा देण्यात येतो. गावातील चर्मकार समाजाला फिरवण्यात येणाऱ्या लाटेच्या (बगाड) रंगरंगोटीचा मान देण्यात येतो. मात्र दासगाव काळभैरव व जोगेश्वरी मंदिराचा जत्रोत्सव हा सर्वधर्मसमभावाचा संदेश देतो.
दासगाव येथील काळभैरव-जोगेश्वरी देवस्थानाची आज जत्रा
By admin | Published: April 03, 2017 3:50 AM