आज तुमचे शब्द फिरलेत, उद्या ह्यांची डोकी फिरली की...; शरद पवारांना हुकूमशहा म्हणाऱ्या तटकरेंवर राष्ट्रवादीची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 11:52 AM2024-01-23T11:52:51+5:302024-01-23T11:53:33+5:30
तटकरे यांनी शरद पवार हे हुकुमशहासारखे वागत होते, असे प्रतिज्ञापत्र विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहे. यावरून आता नवा वाद सुरु झाला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार हे आज ईडीच्या कार्यालयात चौकशीला हजर होणार आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर (एक्स) अकाऊंटवरून अजित पवार गटाचे नेते सुनिल तटकरे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. तटकरे यांनी शरद पवार हे हुकुमशहासारखे वागत होते, असे प्रतिज्ञापत्र विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहे. यावरून आता नवा वाद सुरु झाला आहे.
राहुल गांधी यांच्या पदयात्रेनंतर आपणही पदयात्रा काढावी. महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नेते आहोत, असे दाखवावे, या कारणासाठी काढलेल्या संघर्ष यात्रेला राहुल गांधी यांच्या पदयात्रेपेक्षा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असल्यामुळे कदाचित ते विश्रांतीला गेले असावेत म्हणून त्यांनी पक्षाच्या शिबिराला जाणे टाळले असेल, असा टोला सुनील तटकरे यांनी रोहित पवारांना लगावला होता.
यावर राष्ट्रवादीने व्हिडीओ पोस्ट करत ट्विट केले आहे. ''सत्तेचे गुलाम ही म्हण आजवर महाराष्ट्राने ऐकली होती, वाचली होती पण आज प्रत्यक्षात अनुभव आला. ज्यांनी तुम्हाला पक्षात घेतलं ते शरद पवार, ज्यांनी तुम्हाला बहुमत नसताना पद दिलं ते शरद पवार, ज्यांनी तुमच्यावर होणाऱ्या आरोपांची टिकेची पर्वा न करता तुमची साथ दिली, तुमच्या पाठीशी उभे राहिले ते शरद पवार आज तुमच्यासाठी हुकूमशहा झालेत?'' असा सवाल विचारण्यात आला आहे.
याचबरोबर तटकरे ह्याच सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्या तोंडी तेव्हा तुम्हाला तुरुंगात डांबण्याची भाषा होती हे लक्षात असू द्या. आज तुमचे शब्द फिरलेत, उद्या ह्यांची डोकी फिरली की तुमची ही गरज संपेल हे लक्षात असू द्या, असा इशाराही राष्ट्रवादीने दिला आहे.