काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी आज काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. लोकसभेसाठी ठाकरे गटाने दोनवेळा जिंकलेल्या दक्षिण मुंबई मतदारसंघावर दावा केल्याने पुढील राजकीय वाटचालीसाठी देवरा यांनी शिवसेनेचा मार्ग स्वीकारला आहे.
आज दुपारी देवरा यांनी काँग्रेसच्या १० माजी नगरसेवकांसह शिंदेंच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर शिवधनुष्य हाती घेतला आहे. यावेळी शिंदे गटातील अनेक नेते उपस्थित होते.
काँग्रेसच्या संकटकाळात मी त्यांच्यासोबत होतो. माझ्या वडिलांच्या काळातील काँग्रेस आणि आताची काँग्रेस यामध्ये जमीन अस्मानाचा फरक असल्याची टीका देवरा यांनी यावेळी केली. याचबरोबर उद्धव ठाकरे, काँग्रेसने सकारात्मक, मेरिट आधारित राजकारण केले असते तर शिंदे आणि मला आज इथे येऊन बसावे लागले नसते, असेही देवरा म्हणाले.
मी माझ्या कुटुंबाचे काँग्रेससोबत असलेले ५५ वर्षांचे नाते तोडत आहे. आजच्या काँग्रेसला मोदींना विरोध एवढेच माहिती आहे. शिंदेंचे व मोदी शहांचे व्हिजन मोठे आहे. मला त्यांचे हात बळकट करायचे आहेत. माझे वडील मुरली देवरांना बाळासाहेब महाराष्ट्राचे जावई म्हणायचे. माझ्यावर चुकीचा आरोप होण्याआधी शिंदेंनी मला प्रवेशाचे आमंत्रण दिले, खासदार होऊन मी मुंबई आणि महाराष्ट्राचा विकास करू शकतो, असे देवरा म्हणाले.