मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गटच मुख्य शिवसेना असल्याचे निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवले आहे. तसेच, दोन्ही गटांचे आमदार पात्र ठरवले. निकालादरम्यान, राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या १९९९ सालच्या घटनेचा आधार दिला. तर, सुनिल प्रभूंचा व्हीप अवैध असल्याचे सांगून भरत गोगावलेंचा व्हीप राहुल नार्वेकरांनी मान्य केला आहे. दरम्यान, या निकालावरून ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजचा हा निर्णय कोणताही न्याय नाही. हे एक षडयंत्र आहे. आम्ही याविरोधात सर्वोच्च न्यायालायत नक्की जाणार आहोत, असे संजय राऊत म्हणाले.
दिल्लीतून जे आदेश मिळाले ते आदेश येथे दिले आहेत. संविधान, कायदा, सत्य काय आहे यावर हे आदेश नाहीत. जमिनीवरचे सत्य या आदेशात नाहीत. बाळासाहेब ठाकरेंची शिवेसना ६० वर्षांआधी स्थापना झाली होती. शिवसेनेचे आजचे मालक एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेच्या स्थापनेवेळी किती वय किती होते? त्यांचा तेव्हा जन्म तरी झाला होता का? बाळासाहेब ठाकरेंची शिवेसना इतिहासजमा झाली. भाजपाचे जुनं स्वप्न होते की बाळसाहेबांची शिवसेना एकदिवस संपवणार. पण त्यांचे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. पण बाळासाहेबांची शिवसेना अशा निर्णयांमुळे, अशा कागदपत्रांमुळे संपणार नाही. तर, शिवसेना जतनतेत आहे. महाराष्ट्रातील रक्ता-रक्तात आहे, असे संजय राऊत म्हणाले.
याचबरोबर, आजचा हा निर्णय कोणताही न्याय नाही. हे एक षडयंत्र आहे. आम्ही याविरोधात सर्वोच्च न्यायालायत नक्की जाणार. न्यायालयात आम्ही आमची लढाई सुरूच ठेवणार आहोत. राहुल नार्वेकरांना इतिहास लिहायची संधी दिली होती. त्यांनी ती संधी गमावली आहे. या व्यक्तीनेही महाराष्ट्राच्या पाठीत खंजिर खुपसला आहे. संविधानपीठात बसून त्यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजिर खुपसला. इतिहास त्यांना लक्षात ठेवेल. या निर्णयाविरोधा जे फटाके वाजवत आहेत ते महाराष्ट्राचे गद्दार आणि बेईमान आहे. यांची अवस्था ही इटलीतील मुसोलिनीसारखी होईल, अशी टीका सुद्धा संजय राऊत यांनी केली आहे.