कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावेळी ‘कोल्हापूर बंद’ ठेवण्यासंदर्भात बुधवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत कोणताच निर्णय झाला नाही. आज, गुरुवारी सकाळी ११ वाजता पुन्हा सर्वांशी चर्चा करून अंतिम निर्णय होणार आहे. रुईकर कॉलनी येथे ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निवासस्थानी तब्बल दीड तासाहून अधिक काळ सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीची ही बैठक चालली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रा. पाटील यांनी ही भूमिका मांडली.प्रा.डॉ. पाटील म्हणाले, टोलविरोधी कृती समितीने आपली भूमिका सोडलेली नाही. आमच्या प्रश्नावर आम्ही ठाम आहोत. कोल्हापूरच्या अस्मितेशी आम्ही कदापिही दगा-फटका करणार नाही. आजच्या बैठकीत उपस्थितांची मते जाणून घेतली. अजून काही बैठकीला उपस्थित नसल्याने त्यांची मते जाणून घेता आलेली नाहीत. त्यांचीही मते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वांचे मत ऐकून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणे योग्य नाही. आज, गुरुवारी सकाळी ११ वाजता पुन्हा टोलविरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समितीशी सरकारतर्फे अथवा सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे कोणी संपर्क साधला आहे का? या प्रश्नावर यासंदर्भात कोणीही संपर्क साधला नसल्याचे सांगितले. बैठकीतील पदाधिकाऱ्यांचा सूर कोणता होता? याबाबत विचारणा असता ते म्हणाले, लढा तीव्र करूया, असा बहुतांश जणांचा सूर आहे, परंतु सर्वांचे ऐकून घेतल्याशिवाय लगेच निर्णय घेणे योग्य नाही.बैठकीला शिवसेना-भाजपचे पदाधिकारी होते काय, अशी विचारणा केल्यावर निमंत्रक निवासराव साळोखे यांनी दोन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित नसल्याचे सांगितले. बैठकीला प्रा. डॉ. जे. एफ. पाटील, दिलीप पवार, अशोक पोवार, दिलीप देसाई, बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, अजित सासने, जयकुमार शिंदे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
टोेल आंदोलनासंदर्भात आज निर्णय
By admin | Published: May 21, 2015 12:54 AM