मुंबई - दिल्ली विधानसभेच्या निकालाचे अपडेट हाती येत असून अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पक्षाने मोठी आघाडी घेतली आहे. दिल्लीत आपला स्पष्ट बहुमत मिळेल, असेच दिसून येत आहे. त्याच, पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून आपले मत मांडण्यात येत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीनं भाजपाच्या पराभवावरुन मोदींना टार्गेट केलं. तर, भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपाची बाजू मांडली.
मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत दिल्लीतील जनतेने भाजपला देशद्रोही घोषित केल्याची जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. तर, शिवसेना नेते अनिल परब यांनीही दिल्लीकरांनी भाजपाला नाकारले असे म्हटले आहे. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपली बाजू मांडताना, जागा वाढल्या पण अपेक्षित यश मिळालं नाही. आजचा पराभव उद्याचा विजय असल्याचा युक्तीवाद केलाय. एबीपी माझा वृत्तवाहिनीवरी चर्चेत मुनगंटीवार यांनी भाजपाचा पराभव मान्य करण्यापेक्षा शाब्दीक युक्तीवाद केला. मात्र, केजरीवाल यांना तोडीस तोड उमेदवार देण्यास आम्ही कमी पडलो, असेही ते म्हणाले.
दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. सत्ताधारी आम आदमी पार्टीला बहुमत मिळताना दिसत आहे. तर भाजपानं गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कामगिरीत सुधारणा केली आहे. मात्र काँग्रेसची परिस्थिती जैसे थेच आहे. गेल्या निवडणुकीत भोपळाही फोडू न शकलेली सध्या एकाही विधानसभा मतदारसंघात आघाडीवर नाही. मात्र काँग्रेसच्या कामगिरीचा फायदा अनेक ठिकाणी अप्रत्यक्षपणे भाजपाला झाला आहे.