मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा आज सायंकाळी ६ वाजता शिवाजी पार्कवर होणार असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्य मार्गदर्शन करतील. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, गोवा, बिहार अन् गुजरात आदी राज्यांमधील शिवसैनिकांची हजेरी हे या मेळाव्याचे वैशिष्ट्य असेल. उत्तर प्रदेश आणि गोवामधील विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेने आधीच जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर, काही राज्यांमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांना मुद्दाम बोलविण्यात आले आहे. सोबतच कार्यकर्तेही मोठ्या संख्येने येणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले. शिवाजी पार्कवरील हा मेळावा बऱ्याच वर्षांनंतर कुठलीही आडकाठी न येता होत आहे. जाहीर कार्यक्रमासाठी शिवाजी पार्कचा वर्षातून ५० दिवस वापर करता येईल आणि त्यातील दोन दिवस हे सेनेच्या दसरा मेळाव्यासाठी असतील, असे उच्च न्यायालयाने गेल्यावर्षीच स्पष्ट केले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक समिताचे अध्यक्षपद उद्धव ठाकरे यांना देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. (विशेष प्रतिनिधी)
शिवसेनेचा आज दसरा मेळावा
By admin | Published: October 11, 2016 6:31 AM