मुंबई : समान संख्याबळामुळे शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीची वाटत असताना भाजपाने महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. यामुळे मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच महापौर हे स्पष्ट झाले खरे. मात्र शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांच्या विरोधात दोन याचिका न्यायालयात दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. परिणामी, महापौरपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडल्यानंतरही न्यायालयातील या याचिकांची टांगती तलवार असणार आहे. महापौरपदाची निवडणूक उद्या दुपारी १२ वाजता महापालिका मुख्यालयात होत आहे. या पदासाठी शिवसेना आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरू होती. उभय पक्षांकडून अपक्षांना खेचण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र पारदर्शकतेच्या मुद्द्यावर लढलेल्या भाजपाला मतांची ही फोडाफोडी म्हणजे जनतेची फसवणूक असल्याचा साक्षात्कार झाला. त्यामुळे महापालिकेच्या सर्वच पदांवरील हक्क भाजपाने सोडल्याने महापौरपदाचा शिवसेनेचा मार्ग सुकर झाला आहे. परंतु, या पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेले विश्वनाथ महाडेश्वर हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नियमबाह्य रीतीने पालिका निवडणूक लढवणे, नियमभंग करून महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये सदनिका विकत घेतल्याचा आरोप होत आहे. त्यांनी निवडणूक लढवलेल्या प्रभाग क्रमांक ८७मधील प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार महेंद्र पवार आणि काँग्रेसचे धर्मेश व्यास या दोन पराभूत उमेदवारांनी याचिका दाखल केली आहे. व्यास यांनी लघुवाद न्यायालयात दाद मागितली असून, ६ एप्रिलला सुनावणी होणार आहे. मुंबई महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक उद्या होणार आहे. मात्र त्यापूर्वीच महाडेश्वर यांच्यावर अशा प्रकारे आरोप झाल्याने ते अडचणींना सामोरे कसे जातात याकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. (प्रतिनिधी)फक्त सोपस्कार; भाजपाच्या माघारीमुळे बदलले चित्र - महापालिका निवडणुकीत ११४ जादुई आकडा कोणत्याही पक्षाला गाठता आलेला नाही. त्यामुळे समानसंख्याबळ असलेल्या शिवसेना आणि भाजपामध्ये महापौरपदासाठी चुरस होती. यासाठी शिवसेनेने चार अपक्षांची मतं आपल्याकडे वळवून ८८ संख्याबळ मिळवले आहे. तर भाजपाने दोन अपक्ष आपल्याकडे वळवून ८४ संख्याबळ मिळवले. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, समाजवादी पक्ष ‘किंग मेकर’ ठरणार असे वाटत होते. मात्र आता राजकीय चित्र पालटले. भाजपाने माघार घेतल्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीचे सोपस्कार उद्या पार पडणार आहेत. या पदासाठी शिवसेनेकडून विश्वनाथ महाडेश्वर असून, त्यांना काँग्रेसचे विठ्ठल लोकरे यांनी आव्हान दिले आहे. तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेच्या हेमांगी वरळीकर यांना काँग्रेसच्या विन्फ्रेड डिसोजा यांनी आव्हान दिले आहे. महाडेश्वर यांच्यावरील आरोप - नियमांचा भंग करून महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमधील सदनिका विकत घेतल्याचा आरोप प्रभाग क्र. ८७चे अपक्ष उमेदवार महेंद्र पवार यांनी केला आहे. - याच प्रभागातील काँग्रेसचे उमेदवार धर्मेश व्यास यांनीही महाडेश्वर यांच्यावर नियमबाह्य निवडणूक लढवल्याचा आरोप केला आहे. महाडेश्वर प्राचार्य असलेल्या राजे संभाजी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाला राज्य शासनाचे तसेच प्राथमिक शाळेला महापालिकेचे अनुदान आहे. मुंबई महापालिका कायदा १६ (१(अ १)नुसार मुंबई महापालिकेकडून कोणतेही उत्पन्न मिळत असेल तर नगरसेवकपद रद्द करण्यात येते. - महाराष्ट्र एम्प्लॉईज प्रायव्हेट स्कूल अॅक्टनुसार कलम ४२, ४३मध्ये जर शालेय कर्मचाऱ्यांना कोणतीही निवडणूक लढवायची असेल तर पूर्वपरवानगी घेऊन रजेवर जाणे आवश्यक असते, याकडे व्यास यांनी लक्ष वेधले आहे. तसेच निवडणुकीच्या काळात महाडेश्वर यांनी पगार घेतल्याचा दावाही केला आहे. महाडेश्वरांविरुद्धच्या याचिकेत काय?- महाडेश्वर हे निवडणूक लढवण्यासाठी पात्र नव्हते.- प्रतिज्ञापत्र सादर करताना महाडेश्वर यांनी चुकीची माहिती सादर केली.- चुकीच्या माहितीमुळे महाडेश्वर हे एमएमसीच्या (मुंबई म्युनिसिपल कॉपोर्रेशन) कलम १६नुसार अपात्र ठरतात. तसेच एमएमसीच्या कलम २८ फ आणि २८ ग नुसार ते दोषी ठरतात.- नियमानुसार निवडणूक लढवण्यापूर्वी त्यांनी सरकारी शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा राजीनामा देणे बंधनकारक आहे. मात्र त्यांनी तो दिला नाही. - या सर्व दाव्यांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ८७मधील निवडणूक निकाल रद्द ठरवून आपल्याला विजयी म्हणून घोषित करण्याची मागणीही धर्मेश व्यास यांनी केली आहे.यापूवीर्ही रद्द झाले होते पद महाडेश्वर यांचे नगरसेवकपद २००७मध्ये रद्द करण्यात आले होते. जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप त्यांच्या प्रभागातील प्रतिस्पर्धी उमेदवाराने केला होता. त्यानंतर चौकशीअंती त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले होते.
महापौरपदासाठी आज निवडणूक
By admin | Published: March 08, 2017 2:24 AM