भोर : महाराष्ट्रात प्रसिद्ध मांढरदेव काळूबाईदेवीची बुधवारपासून यात्रा सुरू होत आहे. पुढील तीन दिवस दि. ११, १२ व १३ जानेवारीपर्यंत यात्रा असून, प्रशासन सज्ज झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यावरील खड्डे बुजवून साईडपट्ट्यांची कामे, सूचनाफलक, अतिक्रमणे काढून रंगरंगोटी करण्यात आली आहे. पशुसंर्वधन विभाग, आरोग्य, एसटी महामंडळ, महसूल विभाग यांनी तयारी केली असून २४ तास नियंत्रण कक्ष असेल.महसूल विभागाच्या ६ पथकांची नेमणूक करण्यात आली असून, चार ठिकाणी वाहनतळ करण्यात आला आहे. यात्राकाळात देव, देव्हारे, कोंबडी, बकरी नेण्यास व पशुहत्या करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यावर प्रशासनाची करडी नजर राहील.भोर-मांढरदेवी रस्त्यावरील खड्डे बुजविणे, साईडपट्ट्या भरून घेणे, दिशादर्शक फलक लावणे, खासगी जीपगाड्यांचे थांबे बाजूला करून सदरील रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे काढून रस्ता वाहतुकीला खुला करण्यात आला आहे. पुलांची दुरुस्ती, घाटरस्त्याचे रुंदीकरण करून रिफ्लेक्टर बसवून रंगरंगोटी व फलक लावण्यात आले आहेत.यात्राकाळात भोर आगाराकडून जादा एसटी बस भाविकांसाठी सोडण्यात येणार आहेत. बस चालक, वाहक निर्व्यसनी ठेवण्यात येणार आहेत. बसमधून ढोलताशा, कोंबडी, बकरी नेता येणार नाहीत. आरोग्य विभागाकडून मांढरदेवी रोडवरील ११ गावांतील विहिरींचे पाणी शुद्धीकरण करून घेण्यात आले आहे. भोर-मांढरदेवी रस्त्यावर हॉटेल, ढाब्यांतील शिळे अन्न न टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आंबडखिंड घाटपायथ्याला विजेची, पाण्याची सोय करून वाहनतळ, आरोग्य सुविधा २४ तास ठेवण्यात येणार आहे. पशुसंवर्धन विभागाकडून बकरी, कोंबडी घेऊन जाणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात येईल. मांढरदेवीला जाणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी करण्यात येऊन कारवाई केली जाईल. (वार्ताहर) आरोग्य विभागाकडून आंबडखिंड घाटाखाली २४ तास आरोग्य पथक ठेवण्यात येणार आहे. दोन डॉक्टर व १० कर्मचारी, दोन रुग्णवाहिका १०८ नंबरच्या अॅम्बुलन्स २४ तास राहणार आहेत. उपजिल्हा रुग्णालयात १० बेडची सोय करण्यात येणार आहे. भोर व नसरापूर पोलिसांकडून चेक पोस्ट ठेवून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल. येणाऱ्या वाहनांची पार्किंगची सोय करण्यात आली आहे. दोन पाण्याचे टँॅकर, एक पेट्रोलिंग वाहन घाटाच्या वर, खाली व मध्य भागी महसूल विभागाचे ६ जणांचे पथक ठेवण्यात येईल. यात मंडल अधिकारी, तलाटी, कोतवाल यांचा समावेश आहे. विनापरवाना खाद्यगृह, दारू, तत्सम पदार्थांची विक्री बंद करण्यात आली आहे. एक्साईज इन्सपेक्टर व उपप्रदेशिक परिवहन अधिकारी यांचे पथक कार्यरत राहणार आहे. भोर, एसटी स्टँड, रामबाग, चौपाटी, आंबडखिंड, आयटीआयजवळ पार्किंगची सोय करण्यात आली. तातपुरत्या स्वरूपात १० मुताऱ्यांची सोय करण्यात आली आहे. अवैध प्रवासी वाहतूक होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, मांढरदेवी यात्रेसाठी प्रशासन सज्ज झाले असल्याचे उपविभागीय अधिकारी मौसमी बर्डे व तहसीलदार वर्षा शिंगण यांनी सांगितले.
मांढरदेवीची आजपासून यात्रा
By admin | Published: January 11, 2017 2:25 AM