"मराठी माणसाला अभिमानानं मी मराठी आहे हे बोलायला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच शिकवलं. जो मराठी माणूस खचला होता, दुबळा पडला होता, आपल्या मुंबई, महाराष्ट्रात ज्यानं आत्मविश्वास गमावला होता त्याच्या मनगटात बाळासाहेब ठाकरे यांनी लढण्याची प्रेरणा दिली त्यामुळेच आजचा महाराष्ट्र उभा आहे. आज मराठी माणूस सर्व क्षेत्रात झेप घेताना दिसत आहे. त्याचं मूळ बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या शिवसेनेमध्ये, लढ्यामध्ये आहे. बाळासाहेबांनी महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी अनेक घाव छातीवर झेलेले," असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. "आम्हाला बाळासाहेबांनीचं घडवलं. बाळासाहेब ठाकरे होते म्हणूनच आम्ही आहोत असं म्हणत अनेक शतकं मराठी माणूस त्यांचं स्मरण करत राहील," असंही राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांनी राज्याच्या आणि देशातील राजकारणाला एक वेगळं वळण दिलं. बाळासाहेबांनी हिंदुत्वाची लाटही निर्माण केल्याचंही त्यांनी सांगितलं. "या महाराष्ट्रात मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन असं बाळासाहेबांनी सांगितलं होतं. त्यावेळी सत्तेत काँग्रेस होते. बाळासाहेबांनी त्यानंतर दिलेला शब्द खरा करून दाखवला. मनोहर जोशी, नारायण राणे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले. ते बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच होऊ शकले. आज महाराष्ट्रात जो भाजप आहे त्यांची जी ताकद आहे त्याचंदेखील श्रेय बाळासाहेब ठाकरे यांनाच द्यायला हवं. जर शिवसेनेनं युती केली नसती तर आज राज्यातील गावामध्ये असलेला भाजप दिसला नसता आणि हे सत्य भाजपचे नेतेदेखील स्वीकारतील," असंही राऊत म्हणाले. "राम मंदिराची लढाई बाळासाहेब ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही लढली गेली. बाबरीच्या पतनानंतर त्यांनी ती जबाबदारी आपल्यावर घेतली. जर भाजप त्यांची आठवण काढत असेल तर चांगलंच आहे," असंही ते म्हणाले. भाजपनं कोणते प्रश्न निर्माण करू नये. त्यांची प्रश्नपत्रिका महाराष्ट्राच्या अद्याप चाचणी परीक्षेलाही आलेली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
"खचलेल्या मराठी माणसाच्या मनगटात बाळासाहेबांनी दिलेल्या बळामुळेच आजचा महाराष्ट्र उभा"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 12:31 PM
संजय राऊत यांच्याकडून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा
ठळक मुद्देराऊत यांनी दिला बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा बाळासाहेब ठाकरे होते म्हणूनच आम्ही आहोत, राऊतांचं वक्तव्य