- अतुल कुलकर्णीमुंबई - भाजपा शिवसेनेच्या विरोधात काँग्रेस, राष्टÑवादीसह २३ पक्षांची महाआघाडी अखेर आकाराला आली असून उद्या त्यांची एकत्रित बैठक दुपारी मुंबईत होत आहे. बैठकीनंतर सर्व २३ पक्षांचे नेते एकत्रीतपणे पत्रकार परिषद घेतील. आपापसातील वाद संपुष्टात आणले गेल्याची माहिती दोन्ही काँग्रेसच्या वतीने दिली गेली आहे.एकूण ४८ जागांपैकी काँग्रेसने २६ आणि राष्टÑवादीने २२ जागा लढविण्याचा निर्णय झाला व दोघांनी आपापले मित्रपक्ष त्यात सामावून घ्यायचे असे ठरले होते. त्यानुसार राष्टÑवादीने २२ पैकी १८ जागांचे उमेदवार जाहीर केले असून अमरावतीची जागा युवा स्वाभिमान पक्षाच्या रवी राणा यांच्यासाठी आणि हातकणंगलेची दुसरी जागा त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांच्यासाठी सोडली आहे. ठरल्याप्रमाणे माढ्यातून संजय शिंदे यांना तर उस्मानाबादमधून जगजितसिंह राणा यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.उर्वरित रावेर आणि भंडारा-गोंदिया या दोन जागांचे उमेदवार अद्यापही राष्ट्रवादीने जाहीर केलेले नाहीत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आधी ४ जागा मागितल्या होत्या. शेवटी ते दोन जागांवर तयार झाले. त्यांनी ज्या चार जागा मागितल्या होत्या त्यात वर्धा, शिर्डी, सांगली आणि बुलडाण्याचा समावेश होता. मात्र राष्ट्रवादीने त्यांना हातकणंगलेची जागा दिली आणि बुलडाण्यातून माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांचे नावजाहीर केले.तर स्वाभिमानीने मागितलेल्या उर्वरित तीनही जागा काँग्रेसकडे असताना त्यांनी त्यातील वर्धा आणि शिर्डीचे उमेदवार जाहीर केले आहेत. आता काँग्रेस राजू शेट्टी यांना सांगलीची जागा देणार की अन्य दुसरी जागा यावर अजूनही खलबते चालू आहेत.रावेर आणि औरंगाबाद या दोन जागांच्या अदलाबदलीची चर्चा दोन्ही काँग्रेसमध्ये सुरु असून जर औरंगाबादची जागा काँग्रेसने सोडली तर रावेरची जागा राष्टÑवादी काँग्रेसला देईल. अजूनही तोडगा निघालेला नाही. जर काँग्रेसने जागा सोडली तर आनंदच आहे पण नाही सोडली तर आम्ही आघाडी धर्म पाळू असे राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी लोकमतला सांगितले.पालघरची जागा बहुजन विकास आघाडीलाकाँग्रेसने त्यांच्या कोट्यातून पालघरची जागा बहुजन विकास आघाडीसाठी देण्याचे मान्य केले असून तेथून पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे माजी मंत्री व नंतर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या तिकीटावर निवडून आलेले राजेंद्र गावित हे आता बहुजन विकास आघाडीचे उमेदवार असतील. त्यांच्या नावाची घोषणाही उद्या अपेक्षीत आहे.
रावेर, औरंगाबादवरून आघाडीचा तिढा सुटेना, २३ पक्षांच्या महाआघाडीची आज बैठक
By अतुल कुलकर्णी | Published: March 23, 2019 6:45 AM