लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकरी कर्जमाफीचे निकष ठरविण्यासाठी ‘थकीत कर्जमाफी निकष निर्धारण समिती’ आणि विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची आज सोमवारी बैठक होणार आहे. सह्याद्री अतिथीगृहात दुपारी ४ वाजता ही बैठक होणार असून, त्यासाठी विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे. कर्जमाफीचा निर्णय जाहीर केल्यानंतर कर्जमाफीसाठी निकष ठरविण्याबाबतही निर्णय झाला होता. त्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘थकीत कर्जमाफी निकष निर्धारण समिती’ स्थापन केली. ही समिती आजपासून शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी व शेतकरी प्रतिनिधींसमवेत कर्जमाफीचे निकष ठरविण्यासाठी चर्चा करणार आहे.आजच्या बैठकीसाठी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील, आमदार बच्चू कडू, रघुनाथ दादा पाटील, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, शेतकरी संघटनांची सुकाणू समितीचे संयोजक अजित नवले, बँक कर्मचारी प्रतिनिधी विश्वास उटगी, शेतकरी प्रतिनिधी धनंजय जाधव (पुणतांबे), संजय पाटील, बळीराम सोळंके यांना निमंत्रित केले आहे.
शेतकरी कर्जमाफीच्या निकषांसाठी आज बैठक
By admin | Published: June 19, 2017 2:40 AM