नागपूर - आता खऱ्या अर्थाने 'राजकारण' या शब्दाचा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे. राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण आहे की सत्ताकारण? आहे. जुन्या काळात महात्मा गांधींपासून ज्या राजकीय परंपरेने जे कार्य झाले, ते राजकारण होतं पण ते राष्ट्रकारण, समाजकारण आणि विकासकारण होतं. परंतु सध्या १०० टक्के सत्ताकारण आहे असं नितीन गडकरींनी विधान केले आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांनी ७५ व्या वर्षात पदार्पण केले, त्यानिमित्त शनिवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात त्यांचा अमृत महोत्सवी सत्कार करताना ते बोलत होते. नितीन गडकरी म्हणाले की, सामाजिक परिवर्तनाचं राजकारण हे प्रभावी अंग आहे. या राजकारणात वावरताना शिक्षण क्षेत्र, साहित्यिक, संस्कृती, कला, पर्यावरण या सगळ्या विषयावर काम केले पाहिजे. यातून समाजाला दिशा दिली पाहिजे या भावनेतून गिरीश जोशींनी काम केले. गिरीशभाऊंनी पर्यावरण, साहित्य, संस्कृती, कला, नाटक, पत्रकारिता अशा सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी आपल्या जीवनात जे काम केले, त्याची प्रेरणा नवीन पिढीला मिळावी असं त्यांनी सांगितले.
तसेच माणसाच्या मोठेपणाचा, गुणवत्तेचा, कर्तृत्वाचा त्याच्या निवडून येणाऱ्या गुणवत्तेची काही संबंध नाही. आपल्या समाजात ही भावना आहे जो निवडून येतो तो सिकंदर आहे. वेगवेगळ्या प्रकारची लोक निवडून येतात. राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. निवडणुकीत गाड्या-बसेस भरून लोक आणली जातात ते टाळ्याही वाजवत नाही. भाषण संपायच्या आधी त्यांना जेवणाची व्यवस्था काय झाली याची चिंता असते. मी आजपर्यंत बॅनर लावला नाही. उंदरासारखे आमचे फोटो लावतात आणि खाली स्वत:चा मोठा फोटो लावतो असा टोला गडकरींनी राजकारणात बॅनरबाजी करणाऱ्या नेत्यांना लगावला.
कमिटमेंट केवळ मानवतेशीज्यांचे अंत:करण स्वच्छ आहे, मानवतेशीच ज्यांची कमिटमेंट आहे, अशा लोकांचीच आज खऱ्या अर्थाने गरज आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे केले. गिरीश गांधी असेच व्यक्तिमत्त्व आहे. ते समाजातील वेदना जाणणारे आहेत. त्यांचे अंत:करण स्वच्छ आहे. त्यांची कमिटमेंट ही केवळ मानवतेशी आहे, असेही ते म्हणाले.