मुंबई : ग्रामीण भागातील जनतेचा कौल स्पष्ट करणाऱ्या पहिल्या टप्प्यातील १५ जिल्हा परिषदा आणि १६५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी आज गुरुवारी मतदान होत आहे. एकूण २ हजार ५६७ जागांकरिता ११ हजार ९८९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून २४ हजार ३१ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाची तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे, ही माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी येथे दिली. ‘मिनी मंत्रालय’ अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदांमध्ये यावेळी राज्यपातळीवर कोणत्याच पक्षांची आघाडी आणि युती झाली नसल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष स्वबळावर निवडणूक लढवित आहेत. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर आघाड्या झाल्या आहेत. गेली वीस दिवस प्रचाराने रान पेटले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, नारायण राणे, अजित पवार यांच्या सभांनी प्रचारात रंगत आणली. पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील आठही जिल्हा परिषदांची निवडणूक उद्या होत असल्याने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री पंकजा मुंडे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.मतदानाची वेळमतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत असेल. गडचिरोली जिल्ह्यात मात्र सकाळी ७.३० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल.
आज इथे मतदान जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील ८ पंचायत समित्या व त्याअंतर्गतचे निवडणूक विभाग.