मुंबई : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर पाठवायच्या चार आमदारांसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ५ या कालावधीत मतदान होणार आहे. मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातील या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. तर, धर्मनिरपेक्ष मतांची फूट टाळण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीने आघाडी घोषित केली आहे. त्यातच प्रभावशाली अपक्ष उमेदवारांमुळे निवडणुकीतील रंगत भलतीच वाढली आहे.मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेसमोर आपला बालेकिल्ला राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे. विद्यमान आमदार व मंत्री दीपक सावंत यांचा पत्ता कापून शिवसेनेने विलास पोतनीस यांना उमेदवारी दिली आहे. तीन दशकांपासून हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात असल्याने सेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यातच भाजपाकडून अमितकुमार मेहता, लोकभारतीकडून जालिंदर सरोदे, अपक्ष दीपक पवार आणि राजू बंडगर यांच्यामुळे येथील निवडणूक बहुरंगी बनली आहे. तर कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपाचे आयात उमेदवार निरंजन डावखरे यांच्यासमोर आपला मतदारसंघ राखण्याचे आव्हान आहे. आघाडीचे नजीब मुल्ला, शिवसेनेचे संजय मोरे यांच्यासह एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक एकूण १,०४,२६४ मतदारांनी नोंदणी केली असून एकट्या ठाण्यातून ४५,८३४ मतदारांनी नोंदणी केली आहे. वसंत डावखरे यांच्या निधनानंतर होत असलेल्या या निवडणुकीत निरंजन डावखरे यांना सर्व कसब पणाला लावावे लागणार आहेत.मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे विद्यमान आमदार कपिल पाटील यांच्यासमोर विरोधकांनी तगडे आव्हान उभे केले आहे. मुंबईतून १०,१४१ मतदारांसमोर दहा उमेदवार आहेत. शिवसेनेचे शिवाजी शेंडगे, भाजपाचे अनिल देशमुख यांच्यासह ७ अपक्ष उमेदवारांमुळे या मतदारसंघातील पारंपरिक समीकरणांना धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात भाजपाचे अनिकेत पाटील, संदीप बेडसे, शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. याशिवाय अन्य १३ उमेदवार मैदानात आहेत. नाशिकला मावळते अपक्ष आमदार अपूर्व हिरे यंदा निवडणूक रिंगणात नाहीत. नाशिकसह नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यातील एकूण ५३,८९२ शिक्षक मतदार या विभागात आहेत. हक्काचा मतदार मतदानासाठी बाहेर काढण्याचे मोठे आव्हान उमेदवार आणि पक्षांसमोर आहे. गुरूवारी २८ जून रोजी मतमोजणी होणार आहे.
विधान परिषदेच्या चार जागांसाठी आज मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 6:26 AM