डोंबिवली/कोल्हापूर : कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता रविवार १ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. शिवसेना व भाजपा या राज्यातील सत्ताधारी पक्षांमध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेवर सत्ता काबीज करण्याकरिता बिग फाईट असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. तर कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. कोल्हापूरात ८१ जागांच्या लढतीत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना स्वबळावर तर भाजपाने ताराराणी आघाडीशी युती केली असल्याने सर्वच प्रभागात चुरशीची लढत होणार आहे.
मतदानाचा टक्का वाढावा याकरिता निवडणूक आयोगाने व राजकीय पक्षांनी केलेल्या प्रयत्नांना किती यश लाभते याबाबतही औत्सुक्य आहे. शनिवारी दिवसभर सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी छुप्या प्रचारासह सोशल मिडीयाद्वारे प्रचार केला.
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत अगोदर २७ गावांचा समावेश करून ती वगळण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने त्या गावांमधील संघर्ष समिती व काही राजकीय पक्ष यांच्यात प्रचारादरम्यान संघर्षाचे वातावरण राहिल्याने सध्या या परिसरात तणावाचे वातावरण आहे. मात्र ३२ वर्षांत प्रथमच या २७ गावांत महापालिकेकरिता मतदान होणार असल्याने तेथील मतदारांमध्ये मतदानाबाबत उत्सुकताही असल्याचे बोलले जात आहे.
महापालिका निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात झालेले वाकयुद्ध गाजले. वाघाचा पंजा, वाघाच्या तोंडातील दात, सरकार तडीपार करण्याचे इशारे अशा अनेक वादग्रस्त विधानांमुळे प्रचार तापला होता. राज ठाकरे यांनी नाशिकमधील विकास कामांचा हवाला देत मतदारांना साकडे घातले. आता कुठला पक्ष आपले किती संघटनात्मक बळ लावून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणतो त्यावर निकालाचे गणित अवलंबून राहील.
जास्तीतजास्त मतदानासाठी
निवडणूक आयोग सज्ज झाला असून मतदारांनीही कोणत्याही दबावतंत्राला बळी न पडता मतदान करावे असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी केले.
कल्याण-डोंबिवली महापालिकासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी २१९ मतदान केंद्रे आणि १०१० बुथ आहेत. ११७ झोनल आॅफीसर १२ निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे. आतापर्यंत ८००हून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. ५५ केंद्रे ही संवेदनशील असून त्यात २७ गावांमधील केंद्रांचाही समावेश आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या रिंगणात ७५० उमेदवार असून त्यामध्ये शिवसेना ११५, भाजपा १०९, मनसे ८५, काँग्रेस ५६, राष्ट्रवादी काँग्रेस ४६, बसपा २५, बहुजन विकास आघाडी २०, सीपीआय ४, सीपीएम १, सपा २, रासपा ८, रिपाइं (आठवले) ६, एमआयएम ६, भारिप बहुजन महासंघ ६, आॅल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक ९ व अपक्ष २५२ यांचा समावेश आहे. तसेच, निवडणुकीच्या एकूण १२२ प्रभागांपैकी प्रभाग क्र. ४६, १०५ व ११३ ची निवडणूक बिनविरोध झाली आहे तर प्रभाग क्र. ११४ व ११९ मध्ये एकही नामनिर्देशनपत्र दाखल झालेले नाही.