पुणे : महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा लोकमत माध्यम समूहातर्फे आयोजित व अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी प्रस्तुत आयकॉन्स आॅफ एज्युकेशन महाराष्ट्र या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती झुबीन इराणी यांच्या हस्ते शनिवारी, २० फेब्रुवारीस होणार आहे. हा कार्यक्रम पुण्यातील हॉटेल वेस्टइनमध्ये दुपारी २ वाजता आयोजिलेला आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे व अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील उपस्थित राहणार आहेत. लोकमत माध्यम समूहाचे अध्यक्ष व खासदार विजय दर्डा व लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांची विशेष उपस्थिती असणार आहे. भविष्याचा वेध घेणाऱ्या समर्पित शिक्षण सुधारकांचा यानिमित्ताने सन्मान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम निमंत्रितांसाठी असून राज्यभरातील नामांकित विद्यापीठांचे कुलगुरू, शिक्षण संस्थाचालक, शिक्षणतज्ज्ञ, विविध शैक्षणिक संघटनांचे प्रमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम दोन सत्रांमध्ये होणार असून सकाळच्या सत्रामध्ये ‘शिक्षण संवाद’ या कार्यक्रमांतर्गत विनोद तावडे हे शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधणार आहेत. दुपारच्या सत्रामध्ये स्मृती इराणी यांच्या उपस्थिती व मान्यवरांच्या सहभागात या पुस्तकाचे प्रकाशन केले जाणार आहे. महाराष्ट्रातील सुमारे ८० शिक्षण संस्थांच्या वाटचालीचा वेध आणि त्यांचे शिक्षणक्षेत्राच्या प्रगतीतील योगदान यांचा आलेख या पुस्तकाद्वारे मांडलेला आहे. शून्यातून विश्व उभे केलेल्या कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्त्वांचाही त्यात समावेश आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग करीत राज्यातील शिक्षण विकासाला खऱ्या अर्थाने गती देण्याचे काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या कर्तृत्वावर आधारित असे ‘आयकॉन्स आॅफ एज्युकेशन महाराष्ट्र’ हे पुस्तक आहे. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये व देशपातळीवर अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडत असून त्याचा थेट संबंध शिक्षणाशी व त्यातील गुणवत्तेशी आहे. तरुणांचा देश म्हणून स्वत:ची ओळख निर्माण होत असलेल्या भारतापुढे या तरुणाईतून कुशल मनुष्यबळ घडवण्याचे खरे आव्हान आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याशी व देशाशी संबंधित विषयांवर चर्चा व मंथन घडवून आणण्यासाठी लोकमत माध्यम समूहाने पुढाकार घेतलेला आहे. शिक्षणक्षेत्रासमोर असणारे प्रश्न यानिमित्ताने एकत्रितपणे चर्चेला येणार आहेत, तसेच राज्याशी-राष्ट्रीय स्तरावरच्या विविध प्रश्नांचा ऊहापोहही होणार आहे. देश एका वेगळ््या स्थित्यंतराच्या दिशेने मार्गक्रमण करीत असताना शिक्षणक्षेत्र हे सर्वात महत्त्वाचे असे क्षेत्र आहे. नव्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यावरच देशाचे भवितव्य ठरेल हे लक्षात घेऊन शिक्षणक्षेत्रातही लोकमतने आणखी एक विधायक पाऊल उचलले आहे.
‘आयकॉन्स आॅफ एज्युकेशन महाराष्ट्र’चे आज प्रकाशन
By admin | Published: February 20, 2016 2:47 AM