मुंबई : ओला, उबर यासह अॅग्रीगेटर कंपन्यांवर निर्बंध आणावे, अवैध वाहतुकीवर बंदी आणावी आणि तीन वर्षे झालेल्या लायसन्सधारक रिक्षाचालकांना बॅज देण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी मुंबईतील आॅटोरिक्षा चालकांनी बुधवारी संप पुकारला असून त्यामुळे मुंबईकरांचे मोठे हाल होत आहेत. आॅटोरिक्षा चालक व टॅक्सीमेन्स युनिअनने आज पुकारलेल्या संपात मुंबईतील पूर्व व पश्चिम उपनगरांतील मिळून १ लाखांहून अधिक रिक्षाचालकांनी रिक्षा बंद ठेवल्या आहेत. मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, सातारा, लातूर, नांदेड येथे रिक्षा बंद ठेवतानाच चालकांकडून निदर्शनेही करण्यात येणार आहेत.
दरम्यान संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून प्रशासनाकडून पर्यायी वाहतूक व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. जास्तीच्या बसेस रस्त्यावर उतरवण्यात आल्या आहेत. ओला, उबरसह खासगी टॅक्सी कंपन्यांवर निर्बंध आणावेत या मागणीसाठी २९ आॅगस्टपासून जय भगवान महासंघ आणि स्वाभिमान टॅक्सी युनियनकडून बेमुदत संपाची हाक देण्यात आली आहे. मात्र १ सप्टेंबर रोजी परिवहनमंत्री यांनी चर्चेसाठी बोलावल्याने टॅक्सी संप मागे घेण्यात आला. मुंबई आॅटोरिक्षा व टॅक्सीमेन्स युनियनकडून मात्र आपल्या विविध मागण्यांसाठी ३१ आॅगस्ट रोजी संपाची हाक दिली होती. याबाबत युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले की, मुंबईत पूर्णपणे रिक्षा बंद ठेवल्या जातील. त्याचबरोबर पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर येथेही परिणाम जाणवेल. तर अन्य शहरांत निदर्शने केली जातील. आमच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार न केल्यास गणेशोत्सवानंतर बेमुदत संप पुकारू. मागण्यांचे निवेदन बुधवारी दुपारी परिवहन आयुक्त यांना सादर केले जाईल, असे राव म्हणाले. मुंबईत होणाऱ्या संपात १ लाख ४ हजार रिक्षा सामील होतील. संपामुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी परिवहन विभागाकडून पर्यायी वाहतूक व्यवस्था सज्ज ठेवली आहे. मालवाहू वाहने तसेच इतर प्रवासी वाहने जसे बस व इत्यादीमधून बंद कालावधीत प्रवासी वाहून नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. बेस्ट आणि एसटी महामंडळाच्या बसही आवश्यकतेनुसार प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध राहतील, अशी माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)