ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. 6 - पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होण्यासाठी ‘टॉयलेट लोकेटर’ हे अॅप विकसित करण्यात येणार आहे. शहरातील सुमारे अडीच ते तीन हजार स्वच्छतागृह व शौचालयांची एकत्रित माहितीदेणारे ‘टॉयलेट लोकेटर’ हे अॅप विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली. त्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे असं ते म्हणाले.
पेट्रोल पंप, मॉल, दवाखाने, रेल्वे स्थानके, बसस्थानके आदी ठिकाणी असणा-या शौचालयांची व स्वच्छतागृहांची एकत्रित माहिती यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने देशातील विविध शहरांमध्ये सार्वजनिक व सामुदायिक शौचालये दर्शवणारे ‘टॉयलेट लोकेटर’ अॅप विकसित करून ते उपयोगात आणण्यात येत आहे.
शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर ही माहिती ‘गुगल मॅप’वर टाकण्यात येईल. याचा बाहेरुन आलेल्या नागरिकांना फायदा होईल, शिवाय जवळच्या परिसरात कुठे सार्वजनिक स्वच्छतागृह आहे ते लगेच एका किल्कवर कळणार आहे. देशातील दिल्ली, गुरगाव, फरिदाबाद, गाझियाबाद, नोएडा, इंदूर, भोपाळ या शहरांमध्ये हा प्रयोग राबवण्यात आला आहे. अशा प्रकारचे अॅप विकसित करणारी पिंपरी-चिंचवड ही एकमेव महापालिका आहे असं याबाबत बोलताना सह आयुक्त दिलीप गावडे म्हणाले.
केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने देशातील विविध शहरांमध्ये सार्वजनिक व सामुदायिक शौचालये दर्शवणारे ‘टॉयलेट लोकेटर’ अॅप विकसित करून ते उपयोगात आणण्यात येत आहे.पिंपरी पालिकेनेही त्याचा अवलंब करण्याचे ठरवले आहे. त्यादृष्टीने आवश्यक पावले उचलण्यास पालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे.