पुणे : शाळांकडून घेतले जाणारे बेकायदेशीर शुल्क, पुस्तक व गणवेश खरेदीबाबत पालकांना केली जाणारी सक्ती, विद्यार्थ्यांना दिली जाणारी चुकीची वागणूक, पालक-शिक्षक संघाची स्थापना अशा अनेक प्रकारच्या बाबींविषयी तक्रार करण्यासाठी तसेच मदतीसाठी शिक्षण विभागातर्फे गेल्या वर्षी टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. एका वर्षात सुमारे अडीच हजारांहून अधिक जणांनी टोल फ्री क्रमांकावर फोन केला आहे. मात्र, विद्यार्थी व पालकांऐवजी शिक्षकच या टोल फ्री क्रमांकाचा अधिक उपयोक करीत असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील विद्यार्थी व पालक, शिक्षकांचे तसेच सामान्य नागरिकांचे शिक्षण विभागाशी निगडित असलेले प्रश्न लवकरात लवकर सुटावेत, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे टोल फ्री क्रमांक कक्ष सुरू करण्यात आला. कार्यालयीन वेळेत १८००२३३१८९९ या टोल फ्री क्रमांकावर पालक व विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणविषयक तक्रारी नोंदविता येतात. मात्र, खूप कमी पालकांनी या टोल फ्री क्रमांकाचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे.केवळ पुण्यातीलच नाही, तर राज्यातील कोणत्याही शिक्षण विभागाशी संबंधित असलेली तक्रार या टोल फ्री क्रमांकावर नोंदविली जाते. दररोज तसेच प्रत्येक आठवड्याला प्राप्त झालेल्या तक्रारी टोल फ्री कक्षातर्फे संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविल्या जातात. त्याचप्रमाणे शिक्षण आयुक्त कार्यालयाकडेही याबाबतचा अहवाल सादर केला जातो. विद्यार्थी, पालक, शिक्षकांच्या सर्व प्रकारच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न या कक्षातर्फे केला जातो. काही महिन्यांपूर्वी पिंपरी-चिंचवड येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेने शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना वेगळ्या वर्गात बसविले होते. तसेच, त्यांच्याकडून शुल्क आकारून त्यांना चुकीची वागणूक दिली जात होती. एका पालकाने याबाबत टोल फ्री क्रमांकावरून तक्रार दिली होती. त्यावर प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाने संबंधित शाळेशी संपर्क साधून चौकशी केली. शाळा प्रशासनाला याबाबत समज दिली.
विद्यार्थ्यांपासून ‘टोल फ्री’ दूरच
By admin | Published: May 10, 2016 12:56 AM