कोल्हापूर : शहराची टोलवसुली रद्द करण्याची घोषणा विधानसभेत झाली असली तरी १ जानेवारीपासून कोल्हापूर शहराचा टोलवसुली ठेका रद्द करण्यात आल्याचे पत्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) आय.आर.बी. कंपनीला दिले आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराचा टोल ठेका आज, शुक्रवारपासून अधिकृतरीत्या रद्द करण्यात आला आहे. कोल्हापूर शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी आयआरबी कंपनीने टोल आकारण्यास सुरुवात केल्यानंतर त्याबाबत सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने मोठ्या प्रमाणात आंदोलने करून टोलवसुली ठेका रद्द करण्याची मागणी केली. दरम्यान, याबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेऊन शहराचा टोलवसुलीचा ठेका रद्द करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल रद्द करण्याची घोषणा नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात केली. विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेली घोषणा ही कायदेशीर असते. त्यानंतर तामसेकर मूल्यांकन समितीच्या आधारे ४५९ कोटी रुपये ‘आयआरबी’ कंपनीला देऊन टोलपासून मुक्ती करण्याचा निर्णय झाला. त्याला ‘आयआरबी’ कंपनीने मंजुरीही दिली. त्याबाबत १ जानेवारी या नव्या वर्षापासून टोल रद्द करण्यात आल्याबाबतचे पत्र ‘एमएसआरडीसी’ने दोन दिवसांपूर्वी ‘आयआरबी’ कंपनीस दिले आहे. (प्रतिनिधी)
टोल आजपासून अधिकृतरीत्या रद्द
By admin | Published: January 01, 2016 12:25 AM