मुंबई : मुंबईच्या प्रवेशद्वारावरील पाच टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी केली आहे. या हलक्या वाहनांमध्ये एसटी गाड्यांचाही समावेश आहे. या टोलमाफीमुळे एसटीची दररोज सुमारे दोन लाखांची बचत होणार आहे. राज्य सरकारने वाशी, दहीसर, मुलुंड, ऐरोली आणि लालबहादूर शास्त्री या मुंबईच्या प्रवेशद्वारावर आकारण्यात येणाऱ्या टोलमधून हलक्या वाहनांना वगळले आहे.
राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या गाड्या राज्यातून मुंबईत ये-जा करतात. या गाड्यांच्या सुमारे दोन हजार फेऱ्या होतात. टोलमाफीचा फायदा या दोन हजार फेऱ्या करणाऱ्या गाड्यांना होणार आहे. त्यामुळे एसटीचे टोलच्या माध्यमातून खर्च होणारे सुमारे २ लाख रुपये दिवसाला वाचणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
तिकीट दर कमी करा राज्यातून मुंबईत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या एसटीच्या गाड्यांच्या २००० फेऱ्या होतात. ज्यामध्ये मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या शिवनेरी गाड्यांच्या ३०० फेऱ्यांचा समावेश आहे. एसटीला एका फेरीसाठी साधारण १०० रुपये इतका टोल द्यावा लागतो. टोलच्या माध्यमातून एसटीला दिवसाला सुमारे २ लाख तर महिन्याला ६० लाख रुपयांचा भरावा लागणारा टोल वाचणार आहे. एसटीचा खर्च काही प्रमाणात कमी होणार आहे. त्यामुळे एसटीने प्रवासी तिकीट दरही कमी करावे, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.