ऑनलाइन लोकमत
घोटी(नाशिक), दि. 5 - मुंबई-आग्रा महामार्गावर घोटी आणि पडघा येथे पथकर वसुलीसाठी असणाऱ्या टोलनाक्याचे हस्तांतर केल्यानंतर नवीन कंपनीने कर्मचा-यां विरोधात जाचक निर्णय जाहीर केल्याने संतप्त झालेल्या कर्मचा-यांनी सोमवारी (5 जून) सकाळपासून अचानक काम बंद आंदोलन करत टोलनाकाही बंद केला.यामुळे टोल प्रशासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
मुंबई आग्रा महामार्गाचे चौपदरीकरणं करण्यात आल्यानंतर घोटी आणि पडघा येथे टोलवसुलीसाठी टोलनाके चालू करण्यात आले होते. या टोलनाक्यावर शेकडो स्थानिक युवकांना नोकऱ्या देण्यात आल्या होत्या. मात्र कालांतराने टोल वसुलीचे कंत्राट इतर कंपन्यांना देण्यात आले. यात नुकताच बदल होऊन 1 जूनपासून पुन्हा नव्या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे.
या कंपनीने जुन्या कर्मचा-यांना कामावर ठेवण्याची हमी घेतली मात्र या कर्मचा-यांच्या देशभरात कुठे ही बदली केली जाईल अशी अट घातल्याने कर्मचा-यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान कामगारांना स्थानिक ठिकाणीच काम द्या, अशी मागणी करत सोमवारी सकाळपासून दोन्ही टोलनाके पुढील निर्णय होईपर्यंत बंद ठेवण्यासाठी कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.